बीडमधील बोगस औषधांचे कनेक्शन भिवंडी, गुजरातमध्ये; क्वेटीस बायोटेकच्या संचालकाविरुद्ध गुन्हा

बीड जिह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुरल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तपासणीत बनावट औषध आढळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. या बोगस औषधांचे कनेक्शन भिवंडीपासून गुजरातच्या सुरतपर्यंत पोहचल्याचे तपासात समोर आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी क्वेटीस बायोटेक कंपनीच्या भिवंडी संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील नारपोली येथील मे. क्वेटीस बायोटेक प्रा.लि.कंपनीचे संचालक मिहीर त्रिवेदी व द्विती सुमित त्रिवेदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड येथील बनावट औषध पुरवठा प्रकरणी दाखल गुह्याच्या तपासात बनावट औषधांची तपासणी शासकीय औषध निरीक्षकांनी केली. त्याठिकाणी मेसर्स उत्तराखंड येथील म्रीस्टल फॉर्मुलेशन या अस्तित्वात नसलेल्या बनावट कंपनीकडून उत्पादित केलेल्या अझीमसीम 500 टॅबलेटचा नमुना चाचणीसाठी घेण्यात आला होता. मुंबई येथील शासकीय औषध परीक्षण प्रयोगशाळेत हे औषध बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

पंपनी मालकांनी सदरचा औषध साठा हा मे. काबीज जनरीक हाऊस, मीरा रोड, ठाणे यांच्याकडून खरेदी करून विशाल एन्टरप्राईजेस यांना वितरीत केला होता. तर सुरतच्या कंपनीनेदेखील बनावट औषध साठा भिवंडीच्या कंपनीकडून खरेदी करून कोल्हापूरच्या कंपनीकडे दिल्याचे तपासात समोर आले आहे.

असे आहे प्रकरण

सदरचा औषधसाठा ई निविदेद्वारे कोल्हापूर येथील मे. विशाल एन्टरप्राईजेस यांनी केल्याचे स्पष्ट झाले. कोल्हापूरच्या कंपनीकडून औषधे खरेदी मे. क्वेटीस बायोटेक प्रा.लि. व सुरत दिंडोली येथील मे. फार्मासिक्स बायोटेक यांच्याकडून खरेदी केल्याचे तपासात स्पष्ट झाले.