
अयोध्येतील श्री राम मंदिराच्या शिखराचे बांधकाम सुरू झाले आहे. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहिला दगड रचून शिखराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. 161 फूट उंच कळस 120 दिवसांत तयार होईल. नगारा शैलीतील कळस अष्टकोनी असेल. विशेष म्हणजे हे पहिले राम मंदिर आहे, ज्याचे कळस अष्टकोनी आहे.
मंदिराचे शिल्पकार चंद्रकांत सोमपुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचा कळस सहसा चतुर्भुज असते. परंतु राम मंदिराचा कळस अष्टकोनी असेल. पुरातत्व खात्याच्या उत्खननादरम्यान मंदिराचे गर्भगृह अष्टकोनी असल्याचे समोर आलेय. साधारणपणे श्रीरामाच्या मूर्ती उभ्या स्थितीत असतात. अयोध्येतील श्रीराम मंदिरात भगवान राम आणि सीतामाता सिंहासनावर असतील. दोन्ही बाजूला लक्ष्मण, शत्रुघ्न, भरत आणि हनुमानजी जमिनीवर बसलेले असतील. श्रीरामाच्या दरबारात आल्याची भावना भक्तांना होईल. गर्भगृह 20 बाय 20 फूट चौरस फूट असेल. सीता-रामाच्या मूर्तीची उंची पाच फूट असेल, असे शिल्पकार सोमपुरा यांनी सांगितले.
मार्च 2025 पर्यंत काम
मंदिरात 161 फूट उंच शिखर बांधण्यात येणार आहे. त्यात 45 फूट उंच आणि पाच टन वजनाचा ध्वज खांबही बसवण्यात येणार आहे. यावर राम मंदिराचा झेंडा फडकणार आहे. बांधकामात वास्तुकलेची पूर्ण काळजी घेतली जात आहे. शिखर मार्च 2025 पूर्वी तयार होईल, असे राममंदिराचे वास्तुविशारद आशीष सोमपुरा यांनी सांगितले.