न्यायव्यवस्थेवरून विश्वास कमी होत आहे!

43

ठाणे: ग्राहकांना आपल्या तक्रारी मांडण्यासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रलंबित दाव्यांमुळे ग्राहकांचा न्यायव्यवस्थेवरून विश्वास उडाल्याचे चित्र दिसत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या कालावधीत ९०५ ग्राहक तक्रारींची नोंद झाली आहे. मात्र हा आकडा २०१५ च्या तुलनेत २६० ने कमी असल्याने ग्राहकांना न्याय मिळेलच याची खात्री नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बांधकाम व्यावसायिक, खाद्यपदार्थांचे ब्रॅण्ड्स, इतर वस्तू, औषधे विकत घेतल्यावर कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास ग्राहकाला न्याय देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जेमतेम जागेत ग्राहक न्यायालय सुरू आहे. या न्यायालयावर ठाणे शहरासह कल्याण, उल्हासनगर अंबरनाथ, मुरबाड, शहापूर यासह नवीमुंबईचा काही भाग अखत्यारित येतो. या ग्राहक तक्रार निवारण मंचात २०१६ वर्षात ९०५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २०१५ मध्ये हि संख्या ११६५ इतकी होती. अपुरी जागा, कमी मनुष्यबळ यामुळे प्रलंबित दाव्यांचा गेल्या पाच वर्षातील एवूâण आकडा २०१५ पर्यंत ३०८५ होता. यापैकी १०७४ प्रकरणे निकाली काढली असली तरीही २०१६ वर्षात प्रलंबित दावे २९१६ इतकी आहेत. ही संख्या पाहिल्यानंतर आपला नंबर कधी लागणार असा प्रश्न फसवणूक झालेलया ग्राहकांना पडत असल्याने गेल्या वर्षात त्यांनी न्यायव्यवस्थेकडे पाठ फिरवली आहे.

रेकॉर्ड रूमची व्यवस्था तोकडीच

वेगळ्या जागेत ग्राहक मंचाचा संसार थाटण्याची व्यवस्था सुरू झाली असली तरीही प्रलंबित दाव्यांच्या फाईल्स ठेवण्यासाठी रेकॉर्ड रुम मंचाकडे उपलब्ध नाही. आधीच्या फाईल्स ठेवायला जागा नाही त्यात नवीन दावे दाखल करून कुठे ठेवायचे असा प्रश्न येथील कर्मचाऱ्यांना पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या