
दोन वेळा सोडतीत समावेश करूनही म्हाडाच्या ताडदेवमधील कोट्यवधींच्या घरांकडे विजेत्यांनी पाठ फिरवली आहे. गतवर्षीच्या सोडतीत म्हाडाने क्रिसेंट टॉवरमधील घरांच्या किमती कमी केल्यामुळे तब्बल 43 अर्ज आले होते. त्यामुळे यंदा तरी या घरांची विक्री होईल अशी म्हाडाला आशा होती. मात्र, एकाही विजेत्याने स्वीकृती न दर्शवल्याने ही घरे विक्रीविना धूळ खात पडली आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत सगळ्यांचे लक्ष वेधतात ते ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील महागडी घरे. मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून ही घरे म्हाडाच्या मुंबई मंडळाला सोडतीसाठी मिळाली आहेत. म्हाडाने पहिल्यांदा 2023 च्या सोडतीत येथील सात घरांचा समावेश केला होता. ‘मार्केट व्हॅल्यू’नुसार या घराची किंमत सुमारे 12 कोटी असली तरी म्हाडाने 7 कोटी 52 लाख ते 7 कोटी 57 लाख यादरम्यान किमती ठेवल्या होत्या. विक्री न झाल्याने पुन्हा 2024 च्या सोडतीत येथील सहा घरांचा समावेश करण्यात आला. त्यावेळी या घरांच्या किमती कमी करून त्या 5 कोटी 34 लाख ते 6 कोटी 77 लाख यादरम्यान ठेवल्या होत्या. तरीही या घरांना विजेत्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.
गोरेगावातील 14 कोटींचे दुकानही विक्रीविना
म्हाडाने गेल्या वर्षी 173 दुकानांच्या ई-लिलावासाठी जाहिरात काढली होती. यात गोरेगाव पूर्व बिंबिसार नगर येथील बँकेसाठी आरक्षित असलेल्या एका दुकानाचा देखील समावेश होता. या दुकानासाठी इच्छुकाने 13 कोटी 93 लाख रुपयांची बोली लावली, परंतु विजेत्याने पुढील पैसेच न भरल्यामुळे हे दुकान आता विक्रीविना पडून आहे. त्यामुळे या विजेत्याने भरलेली एक लाख रुपयांची अनामत रक्कम म्हाडाने जप्त केली आहे.
पुन्हा किमती कमी होणार?
क्रिसेंट टॉवरमधील या कोट्यवधींच्या घरांची विक्री करायची कशी, असा पेच सध्या म्हाडापुढे आहे. या घराच्या किमती आणखी कमी करून दिवाळीत येणाऱ्या मुंबई मंडळाच्या लॉटरीत त्यांचा समावेश केला जाणार असल्याची शक्यता आहे. तीन वेळा सोडतीत समावेश करूनही या घरांना प्रतिसाद न मिळाल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर या घरांची विक्री केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.