
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर शनिवारी दुपारी भयंकर अपघात झाला. एका भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने या कंटेनरने तब्बल दोन किलोमीटरपर्यंत 20 गाड्यांना चिरडत नेले. ही घटना द्रुतगती महामार्गावरील नवीन बोगद्याजवळील बायपास ते फुडमॉलदरम्यान घडली. या अपघातात बस, कार, ट्रेलर, टेम्पो अशा 20 गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात एक महिला ठार झाली असून जवळपास 50 जण जखमी झाले आहेत. त्यात लहान मुले, महिला आणि वृद्धांचाही समावेश आहे. जखमींना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले असून काही जणांवर खोपोलीतील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे बोरघाटातील वाहतूक एक तास ठप्प झाली होती.
पुण्याहून मुंबईकडे जाणारा कंटेनर (क्रमांक एम.एच.46-बी.यू.- 3506) हा खोपोली हद्दीतील नवीन बोगद्यात येताच त्याचा ब्रेक फेल झाला आणि या कंटेनरने समोरील वाहनांना जोरदार धडक दिली. ब्रेक फेल झालेल्या खोपोली बायपासपासून सुसाट निघालेल्या कंटेनरने पुढे तब्बल दोन किलोमीटर अंतरावरील फुडमॉलपर्यंत समोर येईल त्या गाड्यांना धडक दिली. त्यामुळे एकच हलकल्लोळ उडाला. हा कंटेनर पुढे कठड्यावर आदळून थांबला असता चालकाने उडी मारून जीव वाचवला.
कंटेनरने धडक दिलेल्या बसमधील 15 प्रवासी जखमी झाले. कार, टेम्पो, ट्रेलरमधील काही जण जखमी झाले. या अपघातात अनिता वेरवंडे (35) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. जखमींना खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातग्रस्त मदत टीम, बोरघाट पोलीस आणि खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
प्रतिभा झिरमिरे, अरुणा झिरमिरे, प्रभावती पवार, रवींद्र झिरमिरे, रेश्मा फरांडे, गौरी फरांडे, अंजली फरांडे, सुजाता फरांडे, अनिकेत फरांडे, ऋतुजा फरांडे, प्रज्ज्वल फरांडे, नीलम फरांडे, स्नेहल फरांडे, वर्षा जगताप, पुष्पा कुदळे, झाया मेहेत्रे अशी जखमींची नावे आहेत.