
एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसताना रत्नागिरी जिल्ह्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा कंत्राटी बीएएमएस डॉक्टर सांभाळत आहेत. मात्र जिल्ह्यातील १०२ कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य सरकारने बिघडवले आहे. हे बीएएमएस डॉक्टर २४ तास सेवा देत आहेत, मात्र त्यांची अवस्था बिनपगारी फुल अधिकारी अशी झाली आहे. कंत्राटी डॉक्टरांना गेले पाच महिने पगार मिळालेला नाही.
रत्नागिरी जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र व २ उपजिल्हा रुग्णालय आहेत. एमबीबीएस डॉक्टर ग्रामीण भागात येऊन सेवा देण्याकडे पाठ फिरवत असल्याने एमबीबीएस डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणाच ‘व्हेंटिलेटरवर’ गेली होती. त्यानंतर बीएएमएस डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले. एकूण १०२ डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक करून कोसळणारी आरोग्य यंत्रणा सावरण्यात आली.
कंत्राटी डॉक्टर प्रति महिना ४० हजार वेतनावर काम करू लागल्यानंतर एकदाही त्यांना वेळेवर पगार सरकारने दिलेला नाही. तरीही सेवेचे व्रत घेतलेले हे डॉक्टर काम करत राहिले आहेत. पगार वेळेवर मिळत नसल्याने, पाच महिने पगार न झाल्याने डॉक्टरांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कुणाचे बॅंक हफ्ते थकले, कुणाच्या मुलांची शाळेची फी भरायची राहिली. कुणाच्या घरात आई-वडीलांच्या आजारपणाचा खर्च आहे. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सांभाळणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य बिघडले आहे.
जबाबदाऱ्या खांद्यावर
कंत्राटी डॉक्टरांवर सलग ड्युटी करण्याची वेळ येत आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांची पूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली जात आहे. अशावेळी जुलै २०२५ पासून कंत्राटी डॉक्टरांना सरकारने पगार दिलेला नाही. गणपती गेले, दिवाळी कोरडी गेली आता नववर्षात तरी पगार मिळणार का? असा सवाल कंत्राटी डॉक्टरांना पडला आहे.

























































