
दहावीच्या परीक्षेत मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका शिक्षकाने सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा प्रकार फलटण तालुक्यात घडल्याच्या चर्चेमुळे पालकवर्गात संताप व्यक्त केला जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
दहावी-बारावीच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही गंभीर असतात. मात्र, फलटण तालुक्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये चक्क सहावीच्या विद्यार्थिनींकडून शिक्षकाने दहावीच्या मराठी विषयाच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्याचे वृत्त पसरल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने एक व्हिडीओदेखील व्हायरल होत असून, त्यामध्ये सहावीतील विद्यार्थिनी पेपर तपासत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकूणच हा प्रकार संतापजनक असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. संबंधित शिक्षकाचा हा बेजबाबदारपणा असून, त्याने दहावीचे पेपर स्वतः तपासण्याऐवजी सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा आरोप होत आहे. बोर्ड आणि शिक्षण विभागाने अशा गैरप्रकारांबद्दल कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.
असे घडलेच नाही – शिक्षणाधिकारी
शिक्षण विभागाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काही अधिकाऱयांना चौकशीकामी संबंधित शाळेकडे पाठवले होते. त्या चौकशीत दहावीचे पेपर विद्यार्थिनींनी तपासले नसल्याचा निष्कर्ष अहवालात निघाला असल्याचा निर्वाळा शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना दिला आहे.

























































