Pahalgam Terror Attack – पत्नीसोबत फिरायला गेलेल्या IAF कर्मचाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप लोकांनी आपला जीव गमावला. यामध्ये हवाई दलाच्या एका कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. IAF चे कर्मचारी कॉर्पोरल तागे हैल्यांग यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. कॉर्पोरल तागे हैल्यांग हे सुट्टीवर होते. आणि पत्नीसह काश्मीरला फिरायला गेले होते.

हैल्यांग हे अरुणाचल प्रदेशातील ताजांग गावचे रहिवासी होते. ते भारतीय हवाई दलात कार्यरत होते. हैल्यांग सुट्ट्यांमध्ये फिरण्यासाठी त्यांच्या पत्नीसोबत कश्मीरला आले होते. ज्यावेळी दहशतवादी हल्ला झाला तेव्हा हे तिथेच उपस्थित होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हैल्यांग यांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे अरुणाचल प्रदेशात शोककळा पसरली आहे.

अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी दहशतवादी हल्ल्यात शहीद हवाई दलाच्या जवानांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. ‘हवाई दलाचे कॉर्पोरल तागे हैल्यांग यांच्या दुःखद निधनाने मला खूप दुःख झाले आहे. अरुणाचल प्रदेशचे एक शूर सुपुत्र आणि ताजांग गावचे रहिवासी हैल्यांग त्यांच्या पत्नीसह पहलगामला फिरण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. हैल्यांग यांनी धैर्याने आणि सन्मानाने देशाची सेवा केली आणि त्यांचे अकाली निधन हे केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण देशाचे मोठे नुकसान आहे. आमच्या संवेदना त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत. कॉर्पोरल हैल्यांग यांच्या सेवेसाठी आणि बलिदानासाठी आम्ही नेहमीच त्यांना लक्षात ठेवू. ओम माने पद्मे हम,”असे पेमा खांडू यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.

दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत हिंदुस्थानला पाठिंबा दिला आहे.

दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध; हिंदुस्थानसोबत ठाम उभे राहणार, जागतिक नेत्यांचे आश्वासन