
राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने ईव्हीएम घोटाळ्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतमोजणी लांबवली आहे. त्यामुळे भाजप आपल्या 175 जागा येणार असल्याचे सांगत आहे. तसे झाल्यास भाजपने बेइमानी करून, ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकल्याचे सिद्ध होईल, असा दावा कॉँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
ईव्हीएम संदर्भात तुमची भूमिका स्वच्छ आहे, तर निकालासाठी 20 दिवस थांबायची वेळ का आली आहे? राज्यातील 268 पैकी 175 जागा भाजपाच्या येथील हे कशाच्या आधारावर बोलतात? तुम्ही असे कोणते दिवे लावले, ज्याने इतक्या जागा येतील ? लाडक्या बहिणीच्या नावाचा वापर करून निवडून आले. ईव्हीएममध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
महायुतीमधील तिन्ही पक्षांत प्रचंड मारामार्या सुरू आहेत. ते एकमेकांविरोधात उभे ठाकलेत. एकमेकांचे कपडे उतरवत आहेत. लोकं हा तमाशा पाहत आहेत. असे असतानाही भाजप आपल्या 175 जागा येणार असल्याची गोष्ट आतापासूनच लोकांच्या मनावर बिंबवत आहेत. हे ईव्हीएम घोटाळा करण्याचे संकेत आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.
एकेका मताला 20 हजार रुपये
सत्ताधारी पक्षाचेच आमदार सांगत आहेत की, आम्ही एकेका मताला प्रत्येकी 20 हजार रुपये दिले. प्रचंड पैशांचा महापूर आला. कामठीत हा प्रकार सर्वांनी पाहिला. उमेदवारांच्या फार्म हाऊसमध्ये झालेल्या घटनेत कोटयवधी रुपये मिळालेत. तरी कारवाई नाही. तुमच्याकडे जनतेचा पाठिंबा आहे, तर तुम्ही मतदानासाठी एवढया पैशांचा वापर कशासाठी? असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

























































