भाजप उमेदवाराच्या होर्डिंगवर फेकले शेण, तर्क-वितर्कांना उधाण

चंद्रपूर शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले भाजपचे उमेदवार सुभाष कासनगोट्टूवार यांच्या होर्डिंगवर शेण फेकण्यात आल्याचा प्रकार घडलाय. प्रभाग क्रमांक एकमधील रामकृष्ण सोसायटी परिसरात सर्वच पक्षांच्या उमेदवारांचे होर्डिंग्ज लागले आहेत. त्याच ठिकाणी भाजपच्या उमेदवारांचे होर्डिंग आहेत. याच होर्डिंगवर शेण फेकल्याचे आज दिसून आले. यातील सुभाष कासनगोट्टूवार यांच्याच प्रतिमेवर हे शेण फेकले गेले, हे विशेष. भाजप प्रदेशाध्यक्षांनी अंतिम केलेल्या उमेदवारांच्या यादीतील सतरा उमेदवार बदलण्याचा प्रताप सुभाष कासनगोट्टूवार यांनी केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने पदावरून हटवण्यात आले होते. ज्या उमेदवारांचे तिकीट कापले, त्यांचा मोठा रोष सुभाष कासनगोट्टूवार यांच्यावर आहे. शेण फेकण्याची कृती त्यातून तर झाली नसावी ना, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे.