
मध्य रेल्वेच्या बदलापूर आणि वांगणी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा जाऊन रुळाचा काही भाग निखळून गेल्याची गंभीर घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. कर्जत रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत किलोमीटर 74/28 कर्जत पुणे डाऊन मार्गावर ही घटना घडली. त्यामुळे मध्य रेल्वेच्या कर्जतकडे धावणाऱ्या ट्रेन आणि एक्सप्रेस सुरक्षेच्या दृष्टिकोनातून थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, याचा थेट परिणाम अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर झाल्याने सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे स्थानकात हाल झाले.
रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार वांगणी रेल्वे स्थानकातील ड्युटीवरील अंमलदार पोलीस शिपाई कदम यांनी माहिती देताना सांगितले की, बदलापूर रेल्वे स्टेशन मास्टर यांना सकाळी रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती 6:40 वाजता मिळाली. त्यानंतर तात्काळ कर्जत दिशेने डाऊन लाईनवरील संपूर्ण वाहतूक थांबवण्यात आली. या दरम्यान एकाच रुळावर लोकल आणि एक्सप्रेस गाडी काही अंतरावर समोरासमोर येण्याचा धक्कादायक प्रसंग घडला. मात्र प्रसंगावधान राखत मोठा अपघात टळला. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
कर्जत दिशेने जाणाऱ्या लोकल व एक्सप्रेस गाड्या जागच्या जागी थांबवण्यात आल्या, परिणामी अप व डाऊन दोन्ही मार्गांची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबईकडे कामासाठी जाणाऱ्या चाकरमानी आणि नोकरदार वर्गाचे मोठे हाल झाले. स्थानकांवर गर्दी वाढली, आणि प्रवाशांना ताटकळत उभं राहावं लागले. या घटनेची गंभीर दखल घेत कर्जत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी योग्य बंदोबस्त लावण्यात आला होता. तांत्रिक विभागाने युद्धपातळीवर काम करून सुमारे दोन तासांनंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली.
एक्स्प्रेसने जाण्यासाठी रेल्वे प्रवाशांना मुभा
बदलापूर आणि वांगणी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला ताडगेल्याने मध्य रेल्वेच्या अप डाऊन मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे कोलंबल्याने दोन तासानंतर एक्सप्रेस ट्रेन धावू लागल्या. मात्र रेल्वे स्थानकात सकाळच्या सुमारास जाणाऱ्या नोकरदार वर्गाची प्रचंड गर्दी वाढली होती. त्यामुळे या प्रवाशी वर्गाला बदलापूर स्थानकात आलेल्या एक्स्प्रेसमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती.