विमानातील सहावी व्यक्ती कुठे गेली?अजित पवार गटाच्या आमदाराने घेतला संशय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला की तो घातपात होता असा संशय व्यक्त होऊ लागला आहे. त्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला होता, मग प्रत्यक्षात पाच मृतदेहच का सापडले? सहावा कुठे गेला, असा सवाल अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

अमोल मिटकरी यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. अजितदादांच्या विमान अपघातानंतर प्रश्नांचा आगडोंब उसळतोय. मृत्यूचे राजकारण करण्याचे पाप आपण करणार नाही, मात्र आपले मन काही प्रश्न विचारतेय असे नमूद करत मिटकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विमानाने टेक ऑफ घेण्यापूर्वी प्रवाशांची यादी डिजिटली नोंदलेली असते, विमानात सहा प्रवासी होते तर विसंगती का? सहावी व्यक्ती कुठे गेली? दुर्घटनास्थळी एखादाही कागदाचा तुकडा जळालेला का दिसत नाही? एवढय़ा वेळा पायलट का बदलले गेले? असे मिटकरी यांनी म्हटले आहे. प्रश्न विचारणे म्हणजे अफवा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

पायलट का बदलले?

अॅड. रुपाली ठोंबरे यांनीही संशय व्यक्त केला आहे. कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश हे दोघेही पायलट ट्रफिकमध्ये अडकल्याचा दावा कसा काय केला गेला? दोघांना एकाचवेळी उशीर कसा झाला? पायलट अचानक बदलण्याचा निर्णय का घेतला गेला, असा सवाल त्यांनी केला.