
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गाड्या ठेकेदार कंपनीकडून चुकीचे फलक आणि काही ठिकाणी फलकच न लावण्यात आल्याने तसेच पर्यायी मार्ग न दिल्याने गाड्या सलग संगमेश्वर बाजारपेठेमधूनच येत असल्याने बाजारपेठेमध्ये वाहनांच्या रांगा लागत आहेत. तसेच महामार्गावरही वाहनांच्या रांगा लागत आहेत. ठेकेदार कंपनीने यामध्ये सुधारणा न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
संगमेश्वर बस स्थानकासमोर चुकीच्या पद्धतीने खड्डा खणून काम सुरू आहे. त्यामुळे सोनवी पुलादरम्यान मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. महामार्गावर रांगा लागत असल्याने अनेक वाहनचालक संगमेश्वर बाजारपेठेमधून जाण्याचा प्रयत्न करतात. संगमेश्वर शास्त्री पूल ते सोनवी पूल यादरम्यान लागणाऱया वाहतूककोंडीमुळे संतप्त झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी ठेकेदार कंपनीने त्वरित पर्यायी मार्ग तयार करण्यात यावा तसेच येत्या दोन दिवसांत हा मार्ग केला नाही, तर ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील, असा इशारा उपतालुकाप्रमुख प्रकाश घाणेकर यांनी दिला आहे.