थकबाकीची रक्कम 44 टक्क्यांनी वाढली, क्रेडिट कार्डचे बिल भरताना घाम फुटतोय!

हिंदुस्थानात क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचवेळी वेळेवर क्रेडिट कार्डचे पेमेंट न करणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. हिंदुस्थानात 91 ते 360 दिवसांसाठी थकबाकी असलेल्या क्रेडिट कार्ड पेमेंटमध्ये एका वर्षात 44.34 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2025 पर्यंत ही रक्कम 33,886.5 कोटी रुपयांपर्यंत वाढली, जी मार्च 2024 मध्ये 23,475.6 कोटी रुपये होती. म्हणजेच, फक्त एका वर्षात सुमारे 10,410.9 कोटी रुपयांची वाढ झाली.

सीआरआयएफ हाय मार्कच्या अहवालात ही माहिती उघड झाली आहे. सीआरआयएफ ही हाय मार्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये नोंदणीकृत क्रेडिट ब्युरो आहे. सीआरआयएफच्या अहवालानुसार, थकबाकीची रक्कम गेल्या वर्षीच्या 20,872.6 कोटी रुपयांवरून 29,983.6 कोटींपर्यंत वाढली. मार्च 2023 च्या पातळीपेक्षा ही रक्कम दुप्पट झाली. हे आकडे केवळ कर्जावरील वाढते अवलंबित्वच दर्शवत नाहीत, तर वेळेवर पेमेंट करण्याची वाढती असमर्थता देखील दर्शवतात. जोखीम पोर्टफोलिओमध्ये 8.2 टक्के वाढ झाली.

‘पोर्टफोलिओ अ‍ॅट रिस्क’ वाढला

सीआरआयएफ हाय मार्क अहवालात उघड झालेली आणखी एक चिंताजनक आकडेवारी म्हणजे ‘पोर्टफोलिओ अ‍ॅट रिस्क’. क्रेडिट कार्ड कर्जाचा किती भाग धोक्यात आहे हे दर्शविणारा हा घटक आहे. मार्च 2025 मध्ये 91-180 दिवसांच्या थकबाकीसाठीचा ‘पोर्टफोलिओ अ‍ॅट रिस्क’ 8.2 टक्केपर्यंत वाढला. त्याचप्रमाणे, 181-360 दिवसांच्या कालावधीतील पीएआर थकबाकी 1.1 टक्केपर्यंत वाढला.

देणी वाढत आहेत…

आजच्या काळात क्रेडिट कार्ड केवळ पेमेंटचा एक पर्याय नाही तर तो लाइफस्टाईलचा हिस्सा बनला आहे. क्रेडिट कार्ड स्वाईप करणे खूप सोपे आहे, पण त्याचे बिल भरणे सोपे नसते. जर देणी वेळेवर भरली नाहीत तर वार्षिक व्याजदर 42 ते 46 टक्के पर्यंत असू शकतो. लोक अनेकदा ऑफर आणि बक्षिसांच्या आमिषाने फसतात. परंतु जर त्यांनी वेळेवर पैसे दिले नाहीत किंवा संपूर्ण बिल वेळेवर भरले नाही तर त्यांचे कर्ज वेगाने वाढते.