गौतम गंभीर बनणार टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक; लवकरच घोषणा होण्याची शक्यता

टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे नाव टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर संपणार आहे. द्रविडने या पदावर कायम राहण्याची विनंती अमा्य केल्याने बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला होता. यात गौतम गंभीरचे नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होते. आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती असून बीसीसीआयकडून या महिन्याच्या अखेरीपर्यंत याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीरची नियुक्ती येत्या काही दिवसांत अधिकृत केल्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यासाठी काही मागण्या केल्या होत्या. त्या बोर्डाने मान्य केल्या आहेत, त्यामुळे त्याची नियुक्ती निश्चित झाल्याची माहिती आहे. आपल्याला सपोर्ट स्टाफ ठरवण्याची मोकळीक दिली जावी अशी गंभीरची मागणी होती. त्याची ही मागणी मान्य करण्यात आली असून या महिन्याच्या अखेरीस बोर्ड गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा होणार आहे. प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंर गंभीर सपोर्ट स्टाफसोबतच संघातही बदल करण्याची शक्यता आहे.

गौतम गंभीरने 58 कसोटी व 147 एकदिवसीय सामन्यांत अनुक्रमे 4154 व 5238 धावा केल्या आहेत. तसेच 37 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत त्याने 932 धावा केल्या आहेत. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी त्याचे नाव आघाडीवर होते. आता त्याच्या नाववर शिक्कामोर्तब झाले असून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.