
पुण्यातील मुळशी तालुक्यात आयोजित ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’दरम्यान अपघाताची घटना समोर आली आहे. अरुंद रस्त्याचा अंदाज न आल्याने 70 हून अधिक सायकलपटू एकमेककांवर आदळले. यात अनेक सायकलपटू जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह करण्यात येत आहे.
मुळशी तालुक्यात मंगळवारी ‘पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर’ चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने रस्त्यांच्या स्थितीचा विचार न करताच स्पर्धा आयोजित केली. वळणावर बॅरिकेटिंग आणि धोक्याच्या सूचना देणारी फलकही कमी होते. मुळशीतील कोळवण रोडवरून जात असताना अरुंद रस्ते आणि वळणाचा अंदाज न आल्याने वेगात जाणाऱ्या सायकलपटूचा तोल गेला. यामुळे एकापाठोपाठ एक सायकलपटू एकमेकांवर आदळले आणि ट्रॅकबाहेर फेकले गेले.
अपघातात अनेक खेळाडू जखमी झाले आहेत. जखमींपैकी 4 ते 5 खेळाडूंना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

























































