
गॅस सिलिंडरचा काळाबाजार करून सिलिंडर अवाच्या सवा किमतीला विकणाऱ्या दोघांवर वाशी पोलिसांनी झडप घालून त्यांच्याकडून १३२ गॅसच्या टाक्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. चार टेम्पोही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. वाशी पोलिसांच्या या धडक कारइवाईमुळे गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वाशी परिसरात एका ठिकाणी गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याची माहिती वाशी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू गाव परिसरात छापा मारून इरफान शेख आणि फिरोज टिटोना या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ८० रिकामे, ५२ भरलेले सिलिंडर जप्त केले. गॅस भरलेले सिलिंडरची किंमत २ लाख ३८ हजार ९२२ असून ३४ हजार ४०० रुपयांचे रिकामे सिलिंडर आहेत.
पोलिसांनी एकूण २ लाख ७३ हजार ३२२ रुपयांचे सिलिंडर आणि ९ लाख ७० हजार रुपयांच्या चार गाड्या अशाप्रकारे एकूण १२ लाख ४३ हजार ३२२ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या दोन संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा सहभाग आहे याचा शोध पोलीस घेत आहेत अशी माहिती वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी दिली.


























































