हायकोर्टात सुटला दादरमधील खोलीचा तिढा; मूळ भाडेकरूच्या मुलाच्या हक्कावर शिक्कामोर्तब

दादरमधील सेनापती बापट मार्गावरील भोहोरी चाळीतील खोलीचा तिढा अखेर हायकोर्टात सुटला. या दहा बाय बारा फूट खोलीवर मूळ भाडेकरूच्या मुलाचा अधिकार आहे, असा निर्वाळा न्यायालयाने दिला.

या चाळीचे मूळ मालक दामजी गाला होते. खोली क्रमांक 11 चे भाडेकरू उदयभान सिंग होते. या दोघांचेही निधन झाले. उदयभान यांच्यानंतर पत्नी प्यारीदेवी यांच्याकडे या खोलीचा हक्क आला. आईच्या निधनानंतर मुलगा उमाकांतने या खोलीवर दावा केला. घराचे कुलूप तोडून नरहरी काsंडा यांच्याकडे खोलीचा ताबा दिला गेला, असा आरोप उमाकांतने केला. खोलीच्या ताब्यासाठी उमाकांतने कोर्टात दावा दाखल केला.

लघुवाद न्यायालयाने उमाकांतचा दावा फेटाळला. त्याविरोधात त्याने अपील दाखल केले. अपील न्यायालयाने उमाकांतचा खोलीवरील दावा मान्य केला. खोलीचा ताबा उमाकांत यांना देण्याचे आदेश अपील न्यायालयाने दिले. अपील न्यायालयाच्या या निर्णयाला गाला यांचा मुलगा व काsंडा यांनी दोन स्वतंत्र अर्ज दाखल करून आव्हान दिले. न्या. राजेश पाटील यांच्या एकल पीठाने हे दोन्ही अर्ज फेटाळून लावत अपील न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

कोर्टाने घर रिकामी करण्याची नोटीस दिली किंवा भाडेकरूने घराचा ताबा स्वतःहून सोडला तरच मूळ भाडेकरूचा त्या घरावर काहीच अधिकार राहत नाही. मूळ भाडेकरूच्या पत्नीने घराचा ताबा सोडला याचा एकही पुरावा सादर झालेला नाही. उदयभान खोलीचे मूळ भाडेकरू होते. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नीकडे या खोलीचा ताबा होता. पत्नीच्या निधनानंतर मुलगा उमाकांत हाच त्यांचा कायदेशीर वारस आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

मूळ भाडेकरूच्या मुलाचे म्हणणे
या खोलीचा ताबा सोडण्यात आला असे मालकाचे म्हणणे आहे. त्याचा एकही कागदोपत्री पुरावा नाही. मला घराबाहेर काढण्याची नोटीस कधीही दिली गेली नाही. नवीन भाडेकरूच्या भाडे पावतीवर मालकाची सही नाही. मालकाविरोधात लघुवाद न्यायालयात दावा दाखल करता येतो. त्यानुसार मी दावा दाखल केला होता, असे उमाकांतने न्यायालयाच्या निदर्शनास आणले.