
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनबाबत कोकणवासीय तसेच विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी आग्रही मागणी करत असतानाही मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारी अडेलतट्टू भूमिका मांडली. दादर-रत्नागिरी पॅसेंजरमुळे लोकलसेवा विस्कळीत होते, असे अजब स्पष्टीकरण देत प्रशासनाने टोलवाटोलवी सुरूच ठेवली. ही पॅसेंजर ट्रेन पूर्ववत सुरू करणार का? या प्रश्नावर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा महाराष्ट्रासोबत सुरू असलेला दुजाभाव पुन्हा उघडकीस आला.
मध्य रेल्वेने मागील आर्थिक वर्षात केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रतीक गोस्वामी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनबाबत विचारणा केली. ही गाडी दादरऐवजी दिवा येथून चालवली जात असल्याने मुंबईतील प्रवाशांची गैरसोय होत असल्याकडे लक्ष वेधण्यात आले. त्यावर, दादर-रत्नागिरी पॅसेंजरमुळे पाच ते सहा लोकल गाडय़ांना उशीर होतो. त्यामुळे ही गाडी दिवा स्थानकातूनच चालवली जाईल, असे गोस्वामी आणि मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले. तसेच कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान पाचव्या ते सहाव्या मार्गीकेचे काम सुरू पूर्ण झाल्यानंतर कोकणसाठी अतिरिक्त गाडय़ा सोडण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
वेळापत्रक कोलमडल्याची कबुली
लोकलसेवेच्या बिघडलेल्या वेळापत्रकाची स्पष्ट कबुली गोस्वामी यांनी यावेळी दिली. विविध कामे सुरू असल्यामुळे मागील वर्षभरात लोकल वेळेवर नव्हत्या. वक्तशीरपणाचे प्रमाण 93 टक्के राहिले. यापुढे यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन गोस्वामी यांनी दिले.
स्वतःच्या अपयशाचे खापर कोकणच्या गाडीवर का फोडता?
मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवेचा वक्तशीरपणा नेहमीच ढेपाळलेला असतो. कोविड काळात 2021 मध्ये दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद केल्यानंतरही लोकलचे वेळापत्रक विस्कळीतच आहे. याला मध्य रेल्वेचे स्वतःचे अपयश कारणीभूत असताना त्याचे खापर कोकणच्या गाडीवर का पह्डले जात आहे? असा संतप्त सवाल कोकण रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटनेचे पदाधिकारी नितीन जाधव यांनी केला.
मध्य रेल्वेकडून महाराष्ट्र व लोकप्रतिनिधींचा अपमान
दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या वेळेतच दादर येथून गोरखपूर ट्रेन सुरू करण्यात आली, मात्र दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरू न करण्याबाबत मध्य रेल्वे अडून आहे. मागील पाच वर्षांत कित्येक लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही मध्य रेल्वे जुमानत नसेल तर हा महाराष्ट्र आणि इथल्या लोकप्रतिनिधींचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया कोकण प्रवासी हक्क कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिली. दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत सुरू केलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.



























































