
तिबेटी बौद्ध धार्मिक नेते आणि धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. आपल्या उत्तराधिकाऱ्याबाबत दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा उत्तराधिकारी तिबेटी बौद्ध परंपरेनुसार निवडला जाईल, ज्यामध्ये चीनची कोणतीही भूमिका राहणार नाही. परंतु या विधानामुळे चीन अस्वस्थ आहे. दलाई लामा यांच्या या वक्तव्याने चीनचा जळफळाट झाला असून दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडताना चीनची परवानगी घ्यावी लागेल,त्याशिवाय नवा उत्तराधिकारी निवडला जाणार नाही, असे चीनने म्हटले आहे.
दलाई लामा यांनी उत्तराधिकाऱ्याबाबत केलेल्या वक्तव्याने चीनचा चांगलाच जळफळाट झाला आहे. संतप्त झालेल्या चीनने म्हटले आहे की, उत्तराधिकारी निवडण्यासाठी बीजिंगची परवानगी घ्यावी लागेल. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग म्हणाले की, दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड चीनच्या शतकानुशतके जुन्या परंपरेनुसार केली जाईल. दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याला चीनच्या नियम आणि धार्मिक रीतिरिवाजांचे पालन करावे लागेल, असेही चीनने म्हटले आहे.
दलाई लामा यांनी त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची जबाबदारी गदेन फोडरंग ट्रस्टकडे सोपवली आहे. त्यांनी सांगितले की, पुढील दलाई लामा यांची ओळख आणि मान्यता या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी फक्त गादेन फोडरंग ट्रस्टवर असेल. 1959 मध्ये ल्हासा येथे चिनी राजवटीविरुद्ध झालेल्या अयशस्वी बंडानंतर दलाई लामा हिंदुस्थानात आले होते. तेव्हापासून ते हजारो तिबेटी लोकांसह येथे निर्वासित जीवन जगत आहेत. तर चीन त्यांना फुटीरतावादी आणि बंडखोर मानतो, तर दलाई लामा यांना अहिंसा आणि करुणेचे प्रतीक जगात ओळख मिळाली आहे.