
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांच्या जागतिक सन्मानांच्या यादीत आता एका आगळ्यावेगळ्या पुरस्काराची भर पडली आहे. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांना पहिला ‘ग्रॅमी पुरस्कार’ (Grammy Award) जाहीर झाला आहे. ‘बेस्ट ऑडिओ बुक, नॅरेशन आणि स्टोरीटेलिंग रेकॉर्डिंग’ या श्रेणीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
दलाई लामा यांच्या ‘मेडिटेशन्स: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज होलीनेस द दलाई लामा’ (Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama) या कलाकृतीला हा पुरस्कार मिळाला. या स्पर्धेत त्यांच्यासमोर अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश केतनजी ब्राउन जॅक्सन, प्रसिद्ध कॉमेडियन ट्रेव्हर नोआ आणि अभिनेत्री कॅथी गारव्हर यांसारख्या दिग्गजांचे आव्हान होते. संगीतकार रुफस वेनराईट यांनी दलाई लामा यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.
या ऑडिओ बुकमध्ये दलाई लामा यांनी गेल्या काही वर्षांत व्यक्त केलेले सजगता (Mindfulness), करुणा, सौहार्द आणि शारीरिक-मानसिक आरोग्यावरील विचार संकलित केले आहेत. विशेष म्हणजे, या विचारांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची जोड देऊन नाविन्यपूर्ण पद्धतीने मांडण्यात आले आहे.
पुरस्कारानंतर दलाई लामांची प्रतिक्रिया
His Holiness the Dalai Lama Receives Grammy Recognition Highlighting Universal Responsibility and Compassion
Grammy Award Best Audiobook Narration – Meditations: The Reflections of His Holiness the Dalai Lama.
I receive this recognition with gratitude and humility. I don’t see… pic.twitter.com/YhK5zlyhem
— Dalai Lama (@DalaiLama) February 2, 2026
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर दलाई लामा यांनी ‘X’ वर आपली भावना व्यक्त केली. ते म्हणाले, ‘हा सन्मान म्हणजे माझी वैयक्तिक उपलब्धी नसून, ही संपूर्ण मानवतेची सामायिक जबाबदारी आहे. शांतता, करुणा, पर्यावरणाची काळजी आणि वसुधैव कुटुंबकमची भावना आज जगातील ८०० कोटी लोकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. ग्रॅमी पुरस्कारामुळे हा संदेश जगभर पोहोचण्यास मदत होईल, याचा मला आनंद आहे.’
निर्वासित जीवन आणि हिंदुस्थानशी नाते
१४ व्या दलाई लामांच्या जीवनाचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. १९५९ मध्ये तिबेटमधील उठावानंतर चिनी सैन्यापासून वाचण्यासाठी त्यांनी सैनिकाच्या वेशात तिबेट सोडले होते. १४ दिवसांच्या खडतर प्रवासानंतर ते हिंदुस्थानात आले. सुरुवातीला मसुरी आणि नंतर धरमशाला येथे स्थायिक होऊन त्यांनी गेल्या ६६ वर्षांपासून मानवी मूल्ये, आंतरधर्मीय सौहार्द आणि तिबेटी संस्कृतीच्या जतनाचे कार्य सुरू ठेवले आहे. सध्या हिंदुस्थानात सुमारे १ लाख तिबेटी नागरिक वास्तव्यास आहेत.
dalai lama wins his first grammy award at 90 for best audio book
tibet’s spiritual leader the dalai lama wins his first-ever grammy award for ‘meditations’ audio book, beating nominees like trevor noah and ketanji brown jackson.























































