आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाबाहेर काढले

पंजाबमध्ये मुक्तसर जिह्यातील इना खेरा गावात एका दलित कुटुंबाला आंतरजातीय विवाहामुळे गावातून हद्दपार करण्यात आले. या कुटुंबातील 22 वर्षीय मुलगा सुरिंदर सिंग याने 18 वर्षीय जाट मुलीशी लग्न केले. त्यानंतर गावात वाद निर्माण झाला. मुलाच्या कुटुंबाला गावाबाहेर काढण्यात आले. हे कुटुंब गेल्या महिनाभरापासून गावाबाहेर राहत आहेत. कुटुंबाचा आरोप आहे की, त्यांच्या अनुपस्थितीत मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचे घर पह्डले आणि लुटले.

7 जुलै रोजी सुरिंदर सिंगने गावातील जाट मुलीशी लग्न केले. दोघांनी पळून जाऊन राजस्थानच्या श्रीगंगानगर जिह्यातील गुरुद्वारात लग्न केले. त्यानंतर दोघांनी कायदेशीररीत्या विवाह प्रमाणपत्र मिळवले. मात्र या लग्नाची बातमी मुलीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. त्यानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला. सुरिंदरच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी मुलीच्या वडील आणि भावासह तिघांना अटक केली. आंतरजातीय संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून पोलीस खबरदारी घेत आहेत.