
गोव्यात कोंकणी विरुद्ध मराठी वादाला तोंड फुटले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी लेखक दामोदर मावजो यांनी मराठी भाषेबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे वाद सुरू झाला आहे. गोव्याच्या राज्यभाषा कायद्यात मराठीचा समावेश नको, असे वादग्रस्त विधान दामोदर मावजो यांनी केले.
‘सरकारी कामकाज केवळ कोंकणीतून व्हावे. यासाठी राजभाषा कायद्यात कोकणी भाषेचा समावेश असावा, मराठीचा समावेश असू नये. कुठल्याही राज्याने दोन भाषांना राजभाषा कायद्यात स्थान दिले नाही. गोवा त्यास अपवाद होऊ शकत नाही. त्यामुळे मराठी भाषेला गोव्याच्या राजभाषा कायद्यात स्थान असूच शकत नाही,’ असे मावजो म्हणाले. त्यांच्या वक्तव्यानंतर गोव्यातील मराठीप्रेमींनी संताप व्यक्त केला. मावजो यांचा निषेध करण्यासाठी मराठीप्रेमी एकवटले. गोव्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली.
गोव्यात भाषिक सौहार्दाचे वातावरण असताना मावजो यांनी केलेले वक्तव्य द्वेष पसरणारे आहे. गोव्यातील नवीन पिढी कोकणीबरोबर मराठीतून साहित्य उत्तम लिहिते. यावर्षी गोवा मराठी अकादमीने मराठी लेखकांची 90 मराठी पुस्तके छापली. मराठी लेखकांची सशक्त पिढी गोव्यात तयार होतेय. हे विधान करून मराठी भाषेचे नुकसान नाही तर कोंकणी भाषेचे होतेय, असे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत म्हणाले. मावजो यांचे वक्तव्य मराठीचा अवमान करणारे आहे, असे मत मराठी राजभाषा प्रस्थापन समितीने नोंदवले.