
सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज टाळसुरे विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांची राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रात रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या माध्यमातून राज्यातील शिक्षण क्षेत्रात दर्जेदार व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे कार्य करणाऱ्या उत्तम दर्जाची दर्जाच्या शिक्षकांची बँक तयार करण्यासाठी राज्यामध्ये आयडॉल शिक्षक शोध प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आली होती.
विविध जिल्ह्यांमधून गुणानुक्रमे 332 नामांकन प्राप्त झाली. यातूनही गुणानुक्रमे राज्यस्तरावर एकूण 42 शिक्षक आयडॉल म्हणून पात्र ठरले. या यादीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड पद्मश्री अण्णासाहेब बेहरे ज्युनिअर कॉलेज टाळसुरे , तालुका दापोली विद्यालयाचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांचे गुणांकन राज्यात अव्वल ठरले असून या यादीमध्ये प्रथम क्रमांकाने त्यांची निवड महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांची आयडॉल शिक्षक म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर विविध प्रशिक्षण कार्यशाळा चर्चासत्रांमध्ये या शिक्षकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभागी केले जाणार आहे. त्यांचे शैक्षणिक कार्य, उपक्रमांचे चित्रीकरण, अभिलेख हे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जाणार आहे. तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य यांना देखील ते उपलब्ध करून दिले जाणार आहे. शिक्षण परिषदांमध्ये या शिक्षकांच्या नावीन्यपूर्ण व विशेष कार्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी उद्बोधन ठेवले जाणार आहे. संबंधित निवड झालेल्या आयडॉल शिक्षकांना विविध समितींच्या बैठका मध्ये सहभागी करून सर्वोत्तम दर्जाच्या शाळा तयार करण्यासाठी यांची मदत घेतली जाणार आहे.





























































