
सॅम करनच्या दुखापतीने हादरलेल्या राजस्थान रॉयल्सला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे करन पूर्ण आयपीएलमधून बाहेर पडताच संघ अडचणीत सापडला होता. मात्र, या धक्क्यानंतर राजस्थानने तत्काळ मास्टरस्ट्रोक खेळत श्रीलंकेचा अष्टपैलू दासुन शनाकाला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे शनाकाने पाकिस्तान सुपर लीग (पीएसल) सोडून आयपीएलमध्ये येण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, शनाकाने आपल्या पीएसएल संघ लाहोर कलंदर्सला या निर्णयाची माहिती दिली असून हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. पीएसएलमधून थेट आयपीएलमध्ये येण्याचा हा निर्णयच सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
शनाका सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही राजस्थानसाठी फायदेशीर ठरणार आहेत. त्याने नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ओमानविरुद्ध 20 चेंडूंत अर्धशतक आणि पाकिस्तानविरुद्ध 31 चेंडूंत नाबाद 76 धावा करत त्याने आपली आक्रमकता दाखवून दिली आहे. तळाच्या फलंदाजीमध्ये तो ‘गेम चेंजर’ ठरू शकतो.
राजस्थानकडे आधीच शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर आणि अॅडम मिल्ने यांच्यासारखी मजबूत विदेशी त्रिकूट आहे. आता शनाकाच्या एंट्रीमुळे संघाला नवं संतुलन मिळालं आहे. 30 मार्चला चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध गुवाहाटीत होणाऱया पहिल्या सामन्यातच शनाकाचा प्रभाव दिसू शकतो.























































