
शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना पण एका चुकीच्या निर्णयाने दिल्लीला महागात पडला. नेहमीच प्रतिस्पर्ध्यांसाठी किलर ठरणारा मिलर काल स्वत:च्या संघासाठीच किलर ठरला. अखेरच्या क्षणी त्याने घेतलेला हट्टी निर्णय दिल्ली पॅपिटल्ससाठी घातक ठरला आणि गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना एका धावेने दिल्लीच्या हातातून निसटला. मिलरच्या या हट्टी निर्णयाचा साऱ्यांनीच खरपूस समाचार घेतला असून चोहोबाजूंनी त्याच्यावर टीकेचे घाव करण्यातही आले आहेत.
या पराभवानंतर हिंदुस्थानचा माजी फिरकीपटू दिनेश कार्तिकने मिलरवर थेट हल्ला चढवत म्हटलं की, पाचव्या चेंडूवर एक धाव घ्यायला हवी होती. हा काही शेवटचा फलंदाज नाही. त्याच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. शेवटच्या दोन चेंडूवर विजयासाठी दोन धावा हव्या असताना मिलरने पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेण्यास नकार दिला. हा निर्णयच दिल्लीवर उलटला. पुढील चेंडूवर मिलर फटका मारण्यास चुकला आणि कुलदीप धाव काढताना बाद झाला. यष्टीरक्षक जोस बटलरने चपळाई दाखवत सामना गुजरातच्या बाजूने फिरवला. मिलरने पाचव्या चेंडूंवर एक धाव घेतली असती तर सामना बरोबरीत पोहोचला असता. मग सहावा चेंडू निर्धाव गेला असता तरी दिल्ली हरले नसते. सामना सुपर ओव्हरमध्ये खेळविला गेला असता. पण मिलरची चूक दिल्लीला महागात पडली.
मिलरचा पूर्ण दोष नाही
मिलरला सामना संपवायचा होता. त्यामुळेच त्याने स्वतŠवर आत्मविश्वास दाखवत कुलदीपला एक धाव काढून फलंदाजी दिली नसावी. पण त्याने कुलदीपला संधी द्यायला हवी होती. त्याचा निर्णय चुकला. पण दिल्लीच्या पराभवासाठी तोच पूर्णपणे चुकीचा नव्हता किंवा त्याचाच दोष नव्हता, अशी संतुलीत प्रतिक्रिया हिंदुस्थानचे महान फलंदाज आणि समालोचक सुनील गावसकर यांनी दिली.
मिलरची शर्थीची झुंज
सामना दिल्लीच्या हातातून निसटला होता. तेव्हाच मिलरने 19 व्या षटकांत 4 चेंडूंत 22 धावा काढून सामना पुन्हा दिल्लीच्या बाजूने झुकवला होता. त्याच्या फटकेबाजीमुळे दिल्लीला शेवटच्या षटकांत 13 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर विपराजने चौकार खेचला, पण तो दुसऱया चेंडूवर बाद झाला. मग तिसर्या चेंडूवर कुलदीपने एक धाव काढून मिलरला स्ट्राइक दिली. तेव्हा मिलरने प्रसिधचा चेंडू प्रेक्षकांमध्ये भिरकावत दिल्लीला विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचवले. या षटकारामुळे दिल्लीला 2 चेंडूंत 2 धावांची गरज होती आणि दिल्लीने हॅटट्रिकची तयारी केली होती, पण पुढच्या दोन चेंडूंनी अनपेक्षित निकाल दिला. जिंकलेला सामना दिल्लीने गमावला आणि हरता हरता गुजरातने आपल्या विजयाचे खाते उघडले. एका धावेच्या पराभवाने दोन्ही संघांची हॅटट्रिक मात्र हुकली.




























































