
गीरच्या जंगलातील जय-विरू या सिंहाच्या जोडीची अखेर झाली. महिन्याभरापूर्वी विरूचे निधन झाले होते, त्याच्या विरहानंतर परममित्र जयने मंगळवारी प्राण सोडले. आता गीरच्या जंगलात दोघांच्या मैत्रीच्या कहाण्याच शिल्लक राहणार आहेत. गुजरातमधील गीरच्या जंगलात जय-विरू या सिंहाची जोडी लोकप्रिय होती. ‘शोले’ चित्रपटातील जय विरूच्या जोडीवरून या सिंहानाही हेच नाव देण्यात आले होते. हे दोन्ही सिंह एकत्रच असायचे. दोघे जंगल सफरीतील पर्यटकांचे आकर्षण होते.
महिन्याभरापूर्वी जय आणि विरू दोन वेगळवेगळ्या ठिकाणी झालेल्या लढाईत जखमी झाले होते. प्रदेशावर अधिकार गाजवण्यावरून ही लढाई झाली होती. आपली हद्द वाचवताना 11 जून रोजी विरूचा मृत्यू झाला. त्यानंतर जयची प्रकृती ढासळत होती. दोघांना वाचवण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्याला यश आले नाही. जय-वीरू जोडी अख्ख्या गीर जंगलावर राज्य करत होते. त्यांच्यासोबत 15 सिंहिणी असायच्या. त्यांचा वावर जंगलभर होता.
वेगळे लढले अन् घात झाला…
जय आणि विरू वेगळे लढले आणि त्यांचा घात झाला. आपले प्रादेशिक क्षेत्र वाचविण्याच्या लढाईत ते जखमी झाले. हे दोन्ही सिंह या वेगवेगळ्या मोर्चांवरील लढायांऐवजी एकत्र असते तर कोणत्याही दुसऱ्या सिंहाची हिंमत झाली नसती. परंतु दोन्ही सिंह आपली हद्द राखत असताना दुसऱ्या सिंहांच्या हल्ल्यात जखमी झाले आणि गतप्राण झाले आहेत, असे वन्यजीव संरक्षक (सासन-गीर) मोहन राम यांनी सांगितले.