मिंधेंच्या उमेदवाराला पिटाळणाऱ्या महिलेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी, सरवणकर पिता-पुत्रांविरोधात तक्रार दाखल

माहीम कोळीवाड्यात आज सकाळी प्रचारासाठी आलेल्या मिंधे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना जाब विचारत पिटाळणाऱ्या महिलेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. ही धमकी सदा सरवणकर यांच्या दोघा समर्थकांनी दिली असून त्यांच्यासह सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर अशा चौघांविरोधात महिलेने माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातील माहीम कोळीवाडा येथे मिंधे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आज सकाळी प्रचारफेरी काढली. यावेळी एका महिलेने कोळीवाडय़ातील फिश फूड स्टॉल हटवल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मते कोणत्या तोंडाने मागता, असे सुनावले. आम्ही फूड स्टॉल लावत होतो, तो का बंद करायला लावला हे आधी सांगा. तो कधी सुरू करणार? तुमच्या हातापाया पडून झाले. आमच्या पोटावर आले आहे. लाडकी बहीण सांगता, मग आम्ही कुठल्या लाडक्या बहिणी आहोत ते सांगा, असा प्रश्नांचा भडिमार करत सरवणकर यांना जाब विचारला. त्यावर आपण घरात बसून चर्चा करूया, असे सरवणकर म्हणाले. मात्र, त्या महिलेने सरवणकरांना घरात घेतले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

मिंधे गटाच्या आमदारावर मतदारांच्या संतापाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. त्यातूनच सरवणकर यांच्या दोघा समर्थकांनी महिलेच्या मुलाला पह्न करून कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या महिलने पोलीस ठाणे गाठून धमकी देणाऱया दोघांसह आमदार सदा सरवणकर आणि त्यांचा मुलगा माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्याविरोधात माहीम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.