
हिंदुस्थानचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठने वरिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदार्पणातच आपली चमक दाखवली. 60 किलो ग्रीको-रोमन गटात त्याने सलग दोन विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली, पण सर्बियाच्या जॉर्जिज तिबिलोवकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले. तरीही त्याच्या या दमदार खेळाने हिंदुस्थानच्या कुस्ती भविष्यासाठी मोठी आशा निर्माण केली आहे.
पहिल्याच सामन्यात सूरजने एंजेल टेलेजला 3-1 ने हरवले. दुसऱया सामन्यात मोलदोवाच्या विक्टर सियोबानूवर 3-1 ने मात केली, पण उपांत्यपूर्व फेरीमध्ये सर्बियाच्या तिबिलोवकडून 1-4 ने पराभव झाला. हिंदुस्थानच्या अन्य ग्रीको-रोमन कुस्तीपटूंनीही समाधानकारक खेळ केला. 72 किलो वजनी गटात अंकित गुलिया कोरियाच्या योंगहुन नोहकडून क्वालिफिकेशन फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेने पराभूत झाला.