राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, विशेष अधिवेशन बोलवा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून तुफान पाऊस सुरू असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने नुकसानीचे पंचनामे न करता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलवण्याचा आग्रहही राष्ट्रवादी धरला आहे, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस सुरू आहे. पावसामुळे हाती आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहे. हातात येणारे पीक पावसामुळे वाया गेल्याने आता काय करायचे असा प्रश्न बळीराजाला पडला आहे. त्यामुळे सर्व निकष बाजूला ठेवून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

महायुती सरकार केवळ बिल्डर, कॉन्ट्रक्टर आणि उद्योगपती यांच्यासाठीच काम करत आहे. सरकारला शेतकऱ्यांची काहीही चिंता नाही. नुकसानीचे पंचनामे करूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही अशी परिस्थिती आहे. त्यातच शेतकऱ्यांवर प्रीपेड मीटर, सोलर मीटरची सक्ती केली गेल्याने बळीराजा पूर्णपणे उद्ध्वस्त होत आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.