संघव्यवस्थापनाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर रो-को नकोत

पुढील महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, सध्याच्या संघ व्यवस्थापनाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर दोघांनीही खेळू नये असे वाटतेय. मात्र, विराट किंवा रोहित यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घ्यावी हे त्या दोघांनाच ठरवू द्या. हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशा शब्दांत हिंदुस्थानचे माजी क्रिकेटपटू दीप दासगुप्ता यांनी खडेबोल सुनावले आहेत. सध्या विराट आणि रोहितच्या निवृत्तीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यानंतर दोघांनीही खेळू नये असे संघ व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मात्र, 2027 मध्ये हिंदुस्थानला एकदिवसीय विश्वचषक जिंकून देण्याचे स्वप्न सध्या विराट आणि रोहित पाहत आहे. याबाबत दासगुप्ता म्हणाले, विराट आणि रोहितला कधी थांबायचे हे सांगण्याचा अधिकार कोणालाही नाही. निवृत्तीबाबतचा निर्णय त्यांनाच घेऊ द्या. कामगिरीच्या आधारावर निवड केली जाते. त्यामुळे त्यांनी जर उत्तम कामगिरी करून दाखवली तर त्यांची निवड करावीच लागेल. विराट आणि रोहित दोघेही तंदुरूस्त आहेत. दोघे पुढील आव्हानांसाठी सज्ज आहेत.

दोघआंमध्ये अजून क्रिकेट बाकी आहे. त्यांना निवृत्तीबाबत सुचवणारे आपण कोण आहोत. रोहित आणि विराटला तंदुरूस्त रहायचे असेल तर त्यांनी आयपीएल शिवाय परदेशात खेळण्याच्या संधी शोधाव्यात. आयपीएल व्यतिरीक्त त्यांनी इंग्लंडला जाऊन 50 षटकांचे सामने खेळू शकतात. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत लीग क्रिकेट खेळण्याच्या पर्यायांचा त्यांनी विचार केला पाहिजे. जर त्यांच्यात क्रिकेट खेळण्याची भूक असेल तर ते नक्कीच अन्य पर्याय शोधतील, असे ही दासगुप्ता म्हणाले.