Iran-Israel war- दिल्ली विमानतळावर हाय अलर्ट; प्रवाशांसाठी Advisory जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी तातडीची नियमावली (Advisory) जारी करण्यात आली आहे. शनिवारपासून सुरू असलेल्या हल्ल्यामुळे अनेक महत्त्वाची विमानतळ बंद करण्यात आली असून अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दिल्ली विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, त्यांनी विमानतळावर येण्यापूर्वी आपल्या संबंधित एअरलाईन्सशी संपर्क साधून फ्लाइटच्या स्थितीची खात्री करून घ्यावी.

युद्धामुळे उद्भवलेल्या धोक्याची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) हिंदुस्थानी विमान कंपन्यांना इराण, सौदी अरेबिया आणि यूएईसह 11 देशांच्या हवाई क्षेत्राचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे दिल्लीहून लंडन, न्यूयॉर्क आणि पॅरिस सारख्या शहरांकडे जाणाऱ्या विमानांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागणार आहे. या बदलामुळे प्रवासाचा वेळ 2 ते 3 तासांनी वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. प्रवासातील वेळ वाढल्य़ामुळे इंधनाच्या खर्चातही वाढ होत असल्याने विमान प्रवासाचे दरही वाढू शकतात.

एअर इंडिया आणि इंडिगो सारख्या प्रमुख कंपन्यांनी आपल्या सर्व सेवा 1 मार्च 2026 पर्यंत स्थगित केल्या आहेत. दिल्लीहून तेल अवीवसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान (AI 139) हवाई क्षेत्र बंद झाल्याने अर्ध्या वाटेतूनच मुंबईकडे वळवण्यात आले. या संकटामुळे दिल्ली विमानतळावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, अनेक प्रवाशांना आपल्या नियोजित सहली रद्द कराव्या लागल्या आहेत.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी त्यांनी सर्व विमानतळांना ‘ऑपरेशनल अलर्ट’वर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विमान कंपन्यांना तिकीट रद्द करणाऱ्यांना पूर्ण परतावा देण्याचे किंवा प्रवासाची तारीख बदलण्याची सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थिती सामान्य होईपर्यंत प्रवाशांनी संयम राखावा आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे