दोन दिवसांत मुख्यमंत्रीपद सोडणार, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

कथित दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपने माझ्यावर अप्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले, आता जनतेच्या कोर्टात माझ्या प्रामाणिकपणाचा निर्णय होईल, ती सांगेल तेव्हाच मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसेन, असे सांगत निवडणुकीपर्यंत मी जबाबदारी स्वीकारणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. आम आदमी पार्टीच्या कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत केजरीवाल बोलत होते.

केजरीवाल निरपराध आहेत की दोषी हा प्रश्न मी आता दिल्लीकरांनाच विचारू इच्छितो. मी काम केले असेल तर मला मतदान करा, असेही केजरीवाल म्हणाले. ते पुढे म्हणाले, भगतसिंग यांच्यानंतर स्वतंत्र हिंदुस्थानात 90 ते 95 वर्षांनंतर एक क्रांतिकारी मुख्यमंत्री तुरुंगात गेला. 15 ऑगस्टच्या तीन दिवस आधी मी नायब राज्यपालांना अतिशी यांना माझ्या जागेवर तिरंगा फडकवण्याची परवानगी द्यावी, असे सांगितले होते. पण हे पत्र राज्यपालांपर्यंत पोहोचलेच नाही, असा आरोप केजरीवाल यांनी केला. यावेळी केजरीवाल यांनी ‘भगतसिंग की जेल डायरी’ हे पुस्तक आणले होते. इंग्रज भगतसिंग यांची पत्रे बाहेर काढायचे. माझे पत्र नायब राज्यपालांना दिले गेले नाही. वर मला पुन्हा असे न करण्याची धमकीही देण्यात आली, असेही केजरीवाल म्हणाले.

दिल्ली विधानसभेच्या  निवडणुका नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात

निवडणुका फेब्रुवारीमध्ये आहेत. परंतु, दिल्ली विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये व्हाव्यात अशी माझी मागणी आहे. महाराष्ट्रासोबत निवडणुका झाल्या पाहिजेत. जनतेचा निर्णय येईपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेणार नाही. आम आदमी पक्षाचा दुसरा पुणीतरी मुख्यमंत्री होईल असे केजरीवाल यांनी सांगितले.

इंग्रजांपेक्षाही जुलमी राज्यकर्ते

स्वातंत्र्यानंतर इंग्रजांपेक्षाही क्रूर आणि जुलमी राज्यकर्ता येईल, असे इंग्रजांनाही वाटले नसेल. भगतसिंग आणि बटुकेश्वर यांनी विधानसभेत बॉम्ब फेकले होते. दोघांनाही त्याच कारागृहात शेजारील कोठडीत ठेवण्यात आले होते. 95 वर्षांनंतर मनीष आणि मी एकाच प्रकरणात तुरुंगात गेलो, दोघांनाही वेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले, गांधी, नेहरू, पटेल तुरुंगात गेले, त्यांना सर्वांना भेटण्याची परवानगी होती,  असे केजरीवालम्हणाले.

मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हे, भाजपाची नवी खेळी

लोकशाही वाचवण्यासाठी मी तुरुंगात असताना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही. माझ्यासाठी संविधान हे सर्वोच्च आहे, असे केजरीवाल म्हणाले. एनडीए सरकारने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही गुन्हे दाखल केले. परंतु, जर या सर्व मुख्यमंत्र्यांना अटक केली तर त्यांनी राजीनामा देऊ नये, तुरुंगातूनच सरकार चालवावे,  कारण ही भाजपाची नवी खेळी असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

नवा मुख्यमंत्री कोण?

नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाचा निर्णय येत्या 2 ते 3 दिवसांत घेण्यात येईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. मनीष सिसोदिया यांच्यावरही माझ्यासारखेच आरोप आहेत. त्यामुळे ते हे पद भूषवणार नाहीत. निवडणूक जिंकल्यावरच ते पुठलेही पद भूषवतील, असे त्यांनीच मला सांगितले आहे, असेही केजरीवाल म्हणाले. त्यामुळे नवा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेन्स वाढला आहे.