
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नवीन सरकारी निवासस्थानाच्या दुरुस्तीसाठी 60 लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) जारी केलेल्या निविदेत म्हटले आहे की दुरुस्तीचा पहिला टप्पा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल आणि त्यात प्रामुख्याने विद्युत सुधारणांचा समावेश असेल. दिल्ली सरकारने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नवीन सरकारी निवासस्थान बंगला क्रमांक 1, राज निवास मार्गासाठी 60 लाख रुपये खर्चून नूतनीकरण प्रक्रिया सुरू केली आहे. यावरून आत आणि भाजपमध्ये आरोप- प्रत्यारोपांचे युद्ध जुंपले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केलेल्या निविदेनुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात विद्युत प्रणालीचे अपग्रेडेशन केले जाईल. यामध्ये 80 दिवे आणि पंखे पुन्हा जोडण्यात येतील. तसेच, दोन टन क्षमतेचे 24 एअर कंडिशनर (अंदाजे 11 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत), 23 ऊर्जा कार्यक्षम छताचे पंखे आणि 16 भिंतीवरील पंखे बसवले जातील.
बंगल्यात 115 लाईट युनिट्स (भिंतीवरील लायटर, हँगिंग लाईट्स आणि 3 मोठे झुंबर यासह) बसवले जातील. ज्याची एकूण किंमत 6.03 लाख रुपये एवढी आहे. जनरल हॉलसाठी 16 निकेल फिनिश फ्लश सीलिंग लाईट्स, 7 ब्रास सीलिंग लॅन्टर, 8 ब्रास आणि काचेच्या भिंतीवरील लाईट्स खरेदी केले जातील. तसेच, 5 टीव्ही युनिट्स देखील प्रस्तावित आहेत.
या खर्चाबाबत आम आदमी पक्ष (आप) आणि काँग्रेसने भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. आपने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्यांच्या ‘मायामहल’वर कोट्यवधी खर्च करत आहेत. तर दिल्लीतील जनता वीज, पाणी, महागाई आणि बेरोजगारीसारख्या समस्यांशी झुंजत आहे. आपने आरोप केला की, लोक त्यांच्या नोकऱ्या आणि घरे वाचवण्यासाठी लढत असताना, सरकार झुंबर, एसी आणि टीव्हीवर जनतेचा पैसा वाया घालवत आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, दिल्लीत जिथे लोकांना त्यांची घरे पाडल्यानंतर बुलडोझरसमोर झोपावे लागते, तिथे मुख्यमंत्री रेखा गुप्ता एक नव्हे तर दोन बंगल्यात राहतील आणि नूतनीकरणाबद्दल ऐकून तुम्हाला धक्का बसेल. त्यांच्या बंगल्यात 24 एसी, महागडे झुंबर, 5 मोठे टीव्ही, गिझर, फ्रिज, वॉशिंग मशीन, डिशवॉशर, महागडे मायक्रोवेव्ह, 115 दिवे, चमकणारे भिंत आणि लटकणारे दिवे आणि रिमोट कंट्रोलसह 23 पंखे बसवले जात आहेत. मजा आणि आनंद! रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानावर होणाऱ्या खर्चावरून आप आणि काँग्रेसने भाजपवर हल्ला चढवला आहे.