
>> नीलेश कुलकर्णी
आसाममध्ये भाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसने ‘आसाम बचाओ’चा नारा दिला आहे. भाजपला सत्तेवरून हटविण्यासाठी राहुल गांधी हे गौरव गोगोईंच्या साथीने प्रयत्न करत आहेत. प्रियंका गांधीही निवडणूक प्रभारी म्हणून आहेतच. मात्र काँग्रेसपुढे त्यांच्या पक्षात लागलेली मोठी गळती कशी रोखायची हा मोठा प्रश्न उभा आहे. प्रादेशिक अस्मितेला कुरवाळत काँग्रेसने ‘आसाम बचाओ’चा नारा दिला असला तरी आसामपेक्षा ‘आसाम काँग्रेस बचाओ’ यासाठीच पक्षाची अधिक मेहनत पणाला लागेल असे दिसतेय.
देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यात आसामसारखे महत्त्वाचे राज्यदेखील आहे. या ठिकाणी दहा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ऍण्टी इन्कम्बन्सी हे भाजपपुढचे सर्वात मोठे आव्हान आहे. त्याचा फायदा प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला होऊ शकतो. मात्र आज त्या पक्षासमोरच भाजपमध्ये पटापट उडय़ा मारणाऱ्या काँग्रेसजनांचे मोठे आव्हान उभे आहे. ही गळती कशी रोखायची हा प्रश्न कांग्रेसपुढे आहे. निवडणुकीच्या तोंडावर भूपेन बोरांनी केलेले पक्षांतर काँग्रेससाठी धक्कादायक ठरले तर विद्यमान खासदार प्रद्युत बारदोलाई यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. शिवाय त्यांचे चिरंजीव प्रतीक यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेत काँग्रेसचे नाक कापण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला आसाममध्ये काँग्रेसचे पारडे जड वाटत होते. मात्र निवडणुकांच्या तारखा जाहीर होईपर्यंत स्थिती वेगाने बदलली आहे, बदलते आहे.
इतर राज्यांत ज्याप्रमाणे ‘इनकमिंग फ्री’चा पॅटर्न भाजपने राबविला तसाच पॅटर्न आसाममध्येही जोरात सुरू आहे. त्यामुळे भाजपच्या पहिल्या यादीत बुहतांश काँग्रेसजनांचाच समावेश आहे. या पॅटर्नसोबतच भाजपने अॅण्टी इन्कम्बन्सी लक्षात घेऊन अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांचे तिकीट कापून आजी-माजी खासदारांना संधी देत ‘मध्य प्रदेश पॅटर्न’ राबविला आहे. 2023 च्या परिसीमनानंतर आसामचा राजकीय नकाशा बदलला आहे. मतदारसंघाच्या सीमा व लोकसंख्येतही मोठे बदल झाले आहेत. त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. शिवाय मदतीला हमखास धावणारा एसआरआय फॅक्टर आहेच. आसामची निवडणूक हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणावर जिंकण्याचा भाजपचा डाव आहे. काँग्रेस आक्रमकपणे प्रचारात उतरली असली तरी तो पक्ष कशा पद्धतीने लढतो यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत. 35 टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या असल्याने काँग्रेसला एरवी आसामची निवडणूक सोपी जायला हवी होती. मात्र भाजपच्या ट्रपमध्ये काँग्रेस पक्ष अडकत चालल्याने निवडणूक अटीतटीची होईल असे दिसते. पोलमध्ये भाजप सरशी मारणार असेच सांगितले जात आहे. आसाममध्ये विजयाचा झेंडा फडकवला तर भाजपची हॅटट्रिक होईल. बद्रुद्दीन अजमल यांचा एयआयूडीएफ व ओवेसींचा एमआयएम किती मतविभाजन करतात यावरही
बरीच गणिते अवलंबून असतील.
आमदार झाल्यासारखं वाटतंय!
‘आमदार झाल्यासारखं वाटतंय…’ हे गाणं मराठीत असलं तरी केरळमच्या काँग्रेस खासदारांना त्याचा मथितार्थ मल्याळम भाषेत समजला असावा. त्यामागचे कारण असे की, केरळमच्या बहुतांश काँग्रेस खासदारांना पुन्हा आमदार व्हावेसे वाटत आहे. आमदारकीची ही उबळ तीव्र होताना येण्यामागचे कारण मल्याळी जनतेची सेवा वगैरे उदात्त असे काही नाही. केरळममध्ये यदाकदाचित सत्ता आलीच तर सत्तेची रसाळ गोमटी फळे चाखता येतील हा यामागचा हिशेब आहे. गेल्या दहा वर्षांपासून केरळममध्ये डाव्यांचे सरकार आहे. साहजिकच सरकारविरोधात अॅण्टी इन्कम्बन्सी आहेच. त्याचे पर्यवसान सत्तांतरात झाले तर केरळममध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागू शकते या संभाव्य शक्यतेने अनेकांची ‘मन में लड्डू फूट रहे’ अशी अवस्था आहे. अनेक इच्छुकांनी मुख्यमंत्रीपदाचे बाशिंगदेखील बांधले आहे. त्यात राहुल गांधींचे राईट हॅण्ड वेणुगोपाळ, शशी थरूर, रमेश चेन्नीथल्ला हे आघाडीवर आहेत. सहा काँग्रेसी खासदारांनीही पुन्हा केरळममध्ये विधानसभेत जावे, असा मानस आखला आहे. अर्थात या सगळ्या बाशिंगधारी इच्छुकांच्या मनोरथावर राहुल गांधींनी पाणी फेरले आहे. हल्ली राहुल हे ठामपणाने निर्णय घेताना दिसत आहेत. कोणत्याही खासदाराला विधानसभेचे तिकीट दिले जाणार नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केल्याने ही खासदार मंडळी आपले सगसोयरे, चेलेचपाटे यांना विधानसभेत कसे पाठवता येईल, यासाठी कसरत करत आहेत.
हरिवंश सिंगांना धक्का
राज्यसभेतून निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये एक नाव होते हरिवंश नारायण सिंग. राज्यसभेचे उपसभापती. पत्रकार ते राज्यसभा उपसभापती असा हरिवंश यांचा प्रवास प्रेरणादायी असला तरी त्यात त्यांनी अनेकदा दलबदलूपणा केला आणि त्यामुळेच देशाचे उपराष्ट्रपती होता होता त्यांचा प्रवास थांबल्याची चर्चा हरिवंश रिटायर्ड झाल्यानंतर संसद भवनात रंगली. लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्याच उत्तर प्रदेशातील बलिया जिह्यातील सीताबदियारा या गावात हरिवंश यांचा जन्म झाला. हरिवंश यांनी पत्रकारितेतून उडी मारत चंद्रशेखर पंतप्रधान असताना त्यांचे सल्लागार म्हणून काम केले. केवळ जेपींच्या गावातील माणूस म्हणून नितीश कुमारांनी त्यांना प्रेमाने वागवले व त्या अर्थाने पक्षासाठी कोणतेही योगदान नसताना 2014 मध्ये राज्यसभेवर पाठवले. राज्यसभेवर आल्यानंतर हरिवंश यांनी उगवत्या सूर्याला दंडवत या न्यायाने मोदी-शहा यांना आपले दैवत मानले. हरिवंश भाजपच्या गोटात इतके आत शिरले की, नितीश कुमारांची बित्तंबातमी दिल्लीकरांना मिळू लागली. भाजप व नितीश बाबूंमध्ये बिनसले तरी हरिवंश यांनी उपसभापतीपदाची खुर्ची काही सोडली नाही. त्याला कारण मोदी-शहा यांचे अभय! हरिवंश यांनी रंग बदलल्यामुळे नितीश कुमार मनातून खट्टू झाले. मात्र महाशक्ती आपल्या पाठीशी आहे. त्यामुळे आपणच पुढचे राज्यसभेचे सभापती होऊ अशा भ्रमात हरिवंश राहिले. भाजप आपल्यालाच ही संधी देईल हा त्यांचा भरवसा होता. मात्र भाजपने राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपती बनवले. भाजपच्या दृष्टीने हरिवंश सिंग यांचे उपयोगिता मूल्य संपले होते. दुसरीकडे नितीश कुमारांनी त्यांच्या नावावर केव्हाच फुली मारली होती. त्यामुळे पत्रकारितेतही फारसे योगदान देऊ न शकलेले हरिवंश राज्यसभेतही फारशी भरीव कामगिरी न करता निवृत्त झाले.






























































