
केवळ विवाहबाह्य संबंधांचा संशय, वैवाहिक आयुष्यातील ताण, नात्यांमधील तणाव या सगळ्या गोष्टी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे कारण ठरत नाहीत, असे महत्त्वाचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले. अशा गोष्टींना प्रत्यक्षात साक्षीदार असेल तरच आत्महत्येला प्रवृत्त केले म्हणून विचारात घेतले जाऊ शकते असे सांगत न्यायालयाने हुंडा मृत्यू प्रकरणात एका व्यक्तीला जामीन मंजूर केला. पतीच्या विवाहबाह्य संबंधांच्या संशयावरून पत्नीने आत्महत्या केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने पतीला दिलासा दिला.
न्यायमूर्ती संजीव नरुला म्हणाले की, पती किंवा पत्नीला आपल्या जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध असल्याची कल्पना आली असेल तरीही ते सुरूच राहिले तर विवाहबाह्य संबंधांकडे क्रूरतेने पाहिले जाऊ शकते. तेव्हा एखाद्या महिलेचा किंवा पुरुषाचा मानसिक छळ झाला आणि आत्महत्या केली असे म्हणता येईल, पण प्रत्येक प्रकरणांमध्ये परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे विवाहबाह्य संबंधांचा संशय हे आत्महत्येला प्रवृत्त करण्याचे कारण ठरू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
नेमके प्रकरण काय?
एका विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, तिच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. आमच्या मुलीने याला विरोध केला असता तिला मारहाण करण्यात आली. याशिवाय मुलीला त्याने त्याच्या कारचे हफ्ते भरण्यासाठी पैसे आणण्यास सांगितले होते. दरम्यान, ज्या विवाहितेचा मृत्यू झाला तिच्या कुटुंबीयांनी तिच्या पतीविरोधात आधी कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही. तसेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले याचे कुठलेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. या प्रकरणातील आरोपी पती मार्च 2024 पासून तुरुंगात आहे. आरोपी पलायन करण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता नसल्याने आरोपीचा जामीन मंजूर करण्यात आला.