वैभव सूर्यवंशीसह 20 जणांचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव; राष्ट्रपतींकडून महाराष्ट्रातील एआय तज्ञ अर्णव महर्षीचाही सन्मान

वीर बाल दिनानिमित्त 20 मुलांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सीमेवर जवानांना चहा आणि नाश्ता देणाऱया फिरोजपूर येथील श्रवण सिंग याच्यासह 14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, 7 वर्षांची ग्रँडमास्टर लक्ष्मी प्रज्ञिका यांचा त्यात समावेश आहे.

शीख बांधवांचे गुरू गुरू गोविंद सिंग यांच्या चार मुलांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हा आजचा दिवस वीर बाल दिन म्हणून पाळण्यात येतो. या वर्षी 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 20 मुलांना वीर बाल पुरस्काराने गौरविण्यात आले. तामीळनाडूची ब्योमा आणि बिहारच्या कमलेश कुमार या दोन मुलांचा मरणोपरांत गौरव करण्यात आला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला.

युवा संशोधकांचा सन्मान

टाकाऊ कागदापासून पेन्सिल बनवण्याचे यंत्र बनविणारी आसामची आयशी बोरा, विनाधूळ उडवणारी थ्रेशर मशीन बनविणारी उत्तर प्रदेशातील बाराबांकी येथीला पूजा, मिझोरमची 9 वर्षीय ‘यूटय़ूब स्टार’ एस्तेर हनामते, पश्चिम बंगालमधील 16 वर्षीय तबलावादक सुमन सरकार तर चंदिगडच्या 17 वर्षीय वंश याचा समाजसेवेसाठी राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्राच्या अर्णवचा सन्मान

एआय सॉफ्टवेअर बनविणाऱया महाराष्ट्रातील अर्णव महर्षी याला विज्ञान श्रेणीतून पुरस्कार देण्यात आला. त्याने दोन सॉफ्टवेअर विकसित केली आहेत. त्याचे पेंद्र सरकारने पेटंट आणि कॉपीराईट्स घेतले आहेत.

शूर बालकांनी लावली प्राणांची बाजी

दोन मित्रांना विजेचा धक्का लागल्यानंतर प्रसंगावधान दाखवून लाकडाच्या मदतीने त्यांचे प्राण वाचविणाऱया केरळच्या मोहम्मद सिदान याचा गौरव करण्यात आला, तर आग्रा येथील अजय राज याने लाकडाने वार करून वडिलांना मगरीपासून वाचविले होते

या मुलांचा गौरव

गिर्यारोहणाच्या सातव्या समिट चॅलेंजमध्ये प्रत्येक खंडातील सर्वात उंच शिखर पादाक्रांत करणाऱया तेलंगणातील मेडचल येथील 16 वर्षीय विश्वनाथ पदकांति याला गौरविण्यात आले. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागातील कोनागाव येथील 14 वर्षीय ज्युडोपटू योगिता मडावी, ओडिशाची युवा वेटलिफ्टर जोशना साबर, झारखंडची 14 वर्षीय फुटबॉलपटू अनुष्का, दिव्यांग पॅरा अॅथलिट 17 वर्षीय शिवानी उप्परा यांचा क्रीडा क्षेत्रातून गौरव करण्यात आला.