
दिल्लीच्या रस्त्यावरील खड्डय़ात पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचा निषेध म्हणून मेणबत्ती मोर्चा काढण्यास निघालेले आम आदमी पक्षाचे खासदार सौरभ भारद्वाज यांना आज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. यावरून जोरदार राडा झाला. पोलीस व्हॅनकडे नेले जात असतानाच सोशल मीडियावर लाइव्ह येत भारद्वाज यांनी सरकार व पोलिसांवर टीकेची तोफ डागली.
दिल्लीच्या जनकपुरी भागातील रस्त्यावर दिल्ली जल बोर्डाने खोदलेल्या खड्डय़ात पडून कमल ध्यानी या 25 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आपच्या नेत्यांनी ध्यानी पुटुंबीयांची भेट घेतली व त्यानंतर ते अपघात स्थळी मेणबत्ती मोर्चा काढण्यासाठी निघाले होते. मात्र, त्याआधीच त्यांना ताब्यात घेण्यात आले.

























































