
राजधानी दिल्लीत गॅस सिलेंडरची साठेबाजी आणि अवैध रिफिलिंग करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासांत विविध भागांत छापेमारी करून मोठ्या प्रमाणात सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.
मुंडका परिसरात गुन्हे शाखेने एका गोदामावर छापा टाकून तब्बल 610 गॅस सिलेंडर जप्त केले. यामध्ये 197 भरलेले आणि 392 रिकामे सिलेंडर होते. तसेच 21 लहान सिलेंडरही जप्त करण्यात आले. संबंधित गोदाम मालकाकडे फक्त इंडेन कंपनीचे व्यावसायिक सिलेंडर विक्रीचे परवाना असताना, इतर कंपन्यांचे सिलेंडरही आढळून आले. स्टॉक नोंदीत मोठी तफावत आढळल्याने आवश्यक वस्तू कायद्याच्या कलम 7 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
गांधीनगर भागात पोलिसांनी राम विलास शर्मा याला अटक केली असून त्याच्याकडून 9 भरलेले सिलेंडर आणि फिलिंग मशीन जप्त करण्यात आली. तो घरगुती सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस भरून अधिक दराने विक्री करत होता. शकरपूरमध्ये योगेश गुप्ता याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून 2 भरलेले घरगुती सिलेंडर आणि 5 किलोचे 3 लहान सिलेंडर जप्त करण्यात आले. तो कोणत्याही परवान्याशिवाय अवैधरित्या गॅस रिफिलिंग करत होता.
बवाना भागात गस्तीदरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीला अवैधपणे गॅस भरताना पकडले. हा व्यक्तीही सिलेंडर अधिक दराने विकत असल्याचे समोर आले. रोहिणी परिसरात पुष्पेंद्र नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली. तो घरगुती सिलेंडरमधून लपूनछपून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस ट्रान्सफर करत होता.
या सर्व कारवायांमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात भरलेले आणि रिकामे सिलेंडर तसेच गॅस भरण्याची यंत्रणा (फिलिंग मशीन) जप्त केली आहे. सर्व आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे.



























































