
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी दिल्ली पोलीस आणि रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे. यादरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. घटनेदिवशी चेंगराचेंगरी होण्याच्या दोन तास आधी सुमारे 2600 हून अधिक अतिरिक्त तिकिटविक्री झाल्याचे उघड झाले आहे. सायंकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत युटीएसवरून ही तिकिटविक्री झाली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकात सायंकाळी 6 ते 8 या वेळेत दररोज सरासरी 7000 तिकिटे बुक होतात. घटनेदिवशी अनारक्षित तिकिटिंग सिस्टम (UTS) वरून 9600 हून अधिक तिकिटांची विक्री झाली. शनिवारी एकूण 54000 हून अधिक सामान्य श्रेणीची तिकिटे बुक झाल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
रेल्वेच्या अन्य एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तिकिट विक्रीवरून प्रवाशांची एकूण संख्या काढता येत नाही. कुंभमेळ्यामुळे सध्या अनेक प्रमुख मार्गांवर तिकिट तपासणी होत नाही. त्यात प्रवाशांची गर्दी पाहता तिकिट तपासणे अशक्य आहे. यूटीएस तिकिटाचा हा आकडा प्रतिबिंबित करणारा आहे, परंतु प्रत्यक्ष गर्दी कितीतरी जास्त असू शकते. या दोन महत्त्वाच्या तासांदरम्यान यूटीएसद्वारे बुक होणाऱ्या अधिक तिकिटांचा अंदाज घेऊन रेल्वे प्रशासनाने तयारी केली असती तर ही घटना टाळता आली असती, असे अधिकाऱ्याने नमूद केले.
प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वरील गाड्या सुटल्यानंतर विशेष ट्रेनची घोषणा झाली असती तर कदाचित ही घटना टाळता आली असती. मगध एक्सप्रेसमध्ये चढू न शकलेले प्रवासी त्याच प्लॅटफॉर्मवरून विशेष ट्रेनमध्ये चढले असते, असे अधिकाऱ्याने पुढे सांगितले.