Video – आकाशात थरार; उड्डाणानंतर विमानचं इंजिन पेटलं, ‘डेल्टा बोईंग 767’चे लॉस एंजेलिसमध्ये इमर्जन्सी लँडिंग

अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या आठवणी अद्यापही ताज्या आहेत. 12 जूनला लंडनला निघालेले एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान उड्डाणानंतर काही क्षणात कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील 52 ब्रिटीश नागरिकांसह 241 प्रवाशांना प्राण गमवावे लागले होते, तर एक जण सुदैवाने वाचला होता. तर विमानाबाहेरील 18 ते 19 जणांचाही यात मृत्यू झाला होता. याच दरम्यान अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात येणाऱ्या लॉस एंजेलिस येथे अहमदाबाद-लंडन विमान अपघाताची पुनरावृत्ती टळली आहे.

डेल्टा एअरलाईन्सच्या अटलांटा येथे जाणाऱ्या विमानाला उड्डाणानंतर काही क्षणात आग लागली होती. त्यामुळे लॉस एंजेलिसमध्ये या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे.

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डेल्टा एअरलाईन्सकडून चालवली जाणारी फ्लाइट 446, बोईंग 767-400 विमान लॉस एंजिलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून झेपावत असताना विमानाच्या डाव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागते. इंजिनमधून आगीच्या ज्वाला येत असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कळताच पायलटने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. इमर्जन्सी लँडिंगनंतर विमानतळावरून अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवते आणि त्यानंतर विमान अटलांटाच्या दिशेने मार्गस्थ होते.

दरम्यान, डेल्टा एअरलाइन्सकडूनही या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. 18 जुलैची ही घटना असून डेल्टा फ्लाइट 446 विमानाच्या डाव्या इंजिनमध्ये उड्डाणानंतर बिघाड झाला. त्यामुळे लॉस एंजेलिस येथे विमानाचे तात्काळ लँडिंग करण्यात आले. या घटनेच्या चौकशीत आणि सुरक्षा प्रोटोकलबद्दल पूर्ण सहकार्य केले जात आहे, असे कंपनीने म्हटले. तर दुसरीकडे अमेरिकन विमान वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन(FAA)ने आग लागण्याचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.