दहशतवादी हल्ल्याआधी पहलगामच्या सॅटेलाईट इमेजची मागणी का वाढली? ‘मॅक्सर टेक्नॉलॉजीज’ कंपनीवर संशय

22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात मोठी घडामोड हाती लागली आहे. हल्ल्याच्या दोन महिने आधी अमेरिकेच्या ‘मॅक्सर टेक्नॉलॉजीज’ या स्पेस टेक कंपनीला पहलगाम परिसरातील हाय रिझोल्यूशन उपग्रहीय छायाचित्रांच्या मोठय़ा ऑर्डर मिळाल्या होत्या. अगदी 12 पटीने जास्त मागणी आली होती. दहशतवादी हल्ल्याच्या एक आठवडय़ापूर्वीपर्यंत हे सुरू होते. विशेष म्हणजे या ‘मॅक्सर टेक्नॉलॉजीज’ची पाकिस्तानच्या ओबैदुल्ला सैयद या पाकिस्तानी नागरिकाच्या कंपनीशी भागीदारी आहे. त्यामुळे पहलगाम हल्ल्याप्रकरणी या कंपनीची भूमिकास्पद संशयास्पद ठरली आहे. जून 2024 मध्ये ‘मॅक्सर टेक्नॉलॉजीज’ने पाकिस्तानची स्थानिक पंपनी ब्युरो ऑफ स्पॅशियल इंटेलिजन्ससोबत (बीएसआय) भागीदारी केली होती.

बीएसआय ही पाकिस्तानी ओबैदुल्ला सैयद यांची कंपनी आहे. भागीदारी झाल्यापासून जम्मू-कश्मीरमधील संवेदनशील भागांच्या छायाचित्रांच्या ऑर्डर वाढल्या. त्यात पहलगामव्यतिरिक्त पुलवामा, पूंछ, अनंतनाग व राजौरीच्या छायाचित्रांची मागणीही वाढली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेने ओबैदुल्लाला 2022 मध्ये लष्करी तंत्रज्ञान पाकिस्तानला शेअर केल्याबद्दल दोषी ठरवले होते. शिक्षा पूर्ण केल्यानंतर तो पुन्हा पाकिस्तानात सक्रिय आहे आणि बीएसआयच्या माध्यमातून जगभरातील डेटा गोळा करत आहे.