
आधुनिक मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर शिक्षण महर्षी आणि हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार जगन्नाथ (नाना) शंकरशेट यांचे नाव मुंबईतील वाशी प्रवेशद्वाराला द्या, अशी आग्रही मागणी नाना शंकरशेट प्रतिष्ठानने महापौर रितू तावडे यांच्याकडे केली. या मागणीला महापौरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
आधुनिक मुंबई घडवण्यात नाना शंकरशेट यांचा सिंहाचा वाटा होता. न्याय, आरोग्य, कला, शिक्षण यांसह मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नाना शंकरशेट यांनी अठराव्या शतकात भरीव निधी देतानाच स्वतःच्या जमिनीही दान केल्या होत्या. हिंदुस्थानातील पहिली रेल्वे सुरू करण्याचा मान नाना शंकरशेट या मराठी माणसानेच मिळवला होता. महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील चार प्रवेशद्वारांना महापुरुषांची नावे देण्यात येतील, अशी नुकतीच घोषणा केली होती. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वाशी येथील प्रवेशद्वाराला नाना शंकरशेट यांचे नाव द्यावे, अशी मागणी नाना शंकरशेट प्रतिष्ठानने महापौर तावडे यांची भेट घेऊन केली. यावेळी महापौरांनी आस्थेने चौकशी करून या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी उपमहापौर संजय घाडी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष, समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी, उपाध्यक्ष समाजश्रेष्ठी दिनकर बायकेरीकर, प्रतिष्ठानचे सरचिटणीस व माजी नगरसेवक अॅड. मनमोहन चोणकर, सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, सदस्य अश्विन उपाध्याय, दिलीप मालंडकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना ठरावाची सूचना मांडणार
या वेळी नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाने महापौर निधीसाठी देणगीचा धनादेश सुपूर्द केला. शिवसेना नगरसेवक हरी शास्त्री यांनी नानांचे नाव वाशी प्रवेशद्वाराला देण्याबाबत महापालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडणार असल्याचे आश्वासन नाना शंकरशेट प्रतिष्ठानच्या शिष्टमंडळाला दिले.



























































