
गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात यंदा जानेवारी ते मे या पाच महिन्यांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये 40 टक्के वाढ झाल्याचे समोर येत आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार 7 मेपर्यंत एकूण 1 हजार 755 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 1 हजार 237 होती. राज्यभर डेंग्यूबाबत सतर्कता असूनही 23 जिह्यांत डेंग्यूचा डंख वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते. यामध्ये पालघर 55 टक्के, तर कोल्हापुरात 70 टक्के वाढ झाल्याचे दिसते. गेल्या वर्षी कोल्हापुरात या कालावधीत 69 रुग्ण होते. यंदाच्या वर्षी ती संख्या 117 इतकी झाली आहे.
सर्वेक्षणानुसार चंद्रपूर, रायगड आणि वर्धा जिह्यात पूर्वी पावसाळ्यापूर्वी एकही प्रकरण नसल्याची वा फक्त एकअंकी आकडेवारी नोंदवत होते. यावर्षी अनुक्रमे 51, 46 आणि 45 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. देशात सन 2001 मध्ये डेंग्यूचा प्रभाव फक्त आठ राज्यांपुरता मर्यादित होता. पण 2023 पर्यंत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कहर झाला आहे. अगदी लडाखही डेंग्यूच्या तावडीतून सुटलेले नाही. गेल्या दोन दशकांत डेंग्यूचा प्रादुर्भाव आणि प्रादुर्भावाच्या वारंवारतेत अकरा पटींनी वाढ होऊन, प्रचंड भौगोलिक प्रसार झाला आहे. जगभरातील सुमारे शंभर देश डेंग्यूच्या विळख्यात असून, जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार अलीकडच्या दशकात डेंग्यूच्या कचाटय़ात जगातील निम्मी लोकसंख्या आली आहे.
डेंग्यूचा प्रभाव आता जागतिक स्तरावर शंभर टक्के आहे. सन 2015-16 सालापर्यंत डेंग्यूची लक्षणे डेंग्यू-मलेरियाच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागाचा वाटा 32 टक्के आहे, जो आता 41 ते 45 टक्के इतका आहे. आईसीएमआर डेंग्यूवर लस शोधण्याचे काम करत आहे. तसेच, देशभरातील डेंग्यू संवेदनशील भागांचा ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. यासह नागरिकांमध्ये डेंग्यूबाबत प्रबोधन करणे, लोकांचा प्रबोधनात्मक उपक्रमात सहभाग वाढण्याकडे कल आहे.
मलेरिया आहेच…!
मलेरियाचे सर्वाधिक रुग्णसंख्या मुंबईत आहेत. यावर्षी चार हजार 554 एकटय़ा मुंबईत मलेरियाग्रस्त होते. तर, गडचिरोली जिह्यात चार हजार 525 मलेरियाचे रुग्ण आढळले. याचा अर्थ राज्याच्या या टोकापासून दुसऱया टोकापर्यंत सर्वच जिह्यात मलेरियाने डोके वर काढले आहे.
दोन प्रकारचे डास कारणीभूत
डेंग्यू हा एडिस इजिप्ती डास चावल्याने होतो. मलेरिया एडिस अल्बोपिक्टस मादी डास जबाबदार आहे. हेच डास चिकुनगुनिया, पिला बुखार तसेच झिका व्हायरसचेही वाहक आहेत.
लक्षणे
– अचानक ताप येणे, खूप मोठय़ा प्रमाणात डोकेदुखी, सांधेदुखी आणि डोळ्यांची जळजळ आणि डोळेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. तापासोबत जोरदार घाम येणे, संपूर्ण अंगदुखी, उलटय़ा होणे ही मलेरियाची लक्षणे आहेत. डेंग्यू-मलेरिया होऊन गेल्यानंतर केस गळण्याची समस्या वाढू शकते. दीर्घकालीन सांधेदुखी. स्नायू कडक होणे, वजन कमी होणे आणि थकवा येणे आदी समस्या अनेक महिने कायम राहतात.
मलेरियाची शासकीय आकडेवारी
वर्षे रूग्णसंख्या
2020 8,866
2021 15,215
2022 17,341
2023 14,671
2024 10,978 (मे अखेर)
राज्यातील टॉप सहा जिह्यांतील रुग्णसंख्या
जिल्हा जानेवारी-मे 2023 जानेवारी-मे 2024
कोल्हापूर 69 117
पालघर 112 174
मुंबई 325 285
अकोला 26 71
नांदेड 35 58
चंद्रपूर 7 51