
पत्नीने पतीला शरीरसंबंध नाकारणे, विवाहबाह्य संबंध असल्याचा पत्नीने पतीवर संशय घेणे ही क्रूरताच आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
पुणे कुटुंब न्यायालयाने एका जोडप्याचा घटस्फोट मंजूर केला. त्याविरोधात पत्नीने अपील याचिका दाखल केली होती. ही अपील याचिका फेटाळताना न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला. हे जोडपे पुन्हा एकत्र येणे अशक्य आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.
नातलग, मित्रांसमोर अपमान करणे छळच
– नातलग, मित्र व माझ्या सहकारी कर्मचाऱ्यांसमोर पत्नी अपमान करायची. हा एक प्रकारचा छळच आहे, असा दावा पतीने घटस्फोट मागताना केला होता. तोदेखील न्यायालयाने मान्य केला. पत्नीचे एपंदरीत वर्तन हे पतीला त्रास देणारेच होते. हे वर्तन क्रूरतेच्या व्याख्येत येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
या जोडप्याचा 2013मध्ये विवाह झाला. वाद सुरू झाल्याने हे दोघे 2014पासून स्वतंत्र राहत होते. त्यानंतर पतीने घटस्फोटासाठी पुणे कुटुंब न्यायालयाचे दार ठोठावले. पत्नी शरीरसंबंधास नकार देते. विवाहबाह्य संबंध असल्याचा माझ्यावर संशय घेते. नातलग, मित्र व सहकारी कर्मचाऱ्यांसमोर अपमान करते. त्यामुळे घटस्फोट मंजूर करावा, अशी मागणी पतीने केली. पुणे कुटुंब न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. त्याविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात धाव घेतली. सासरचे मला त्रास द्यायचे. माझे पतीवर प्रेम आहे. पुणे कुटुंब न्यायालयाने मंजूर केलेला घटस्फोट रद्द करावा, अशी विनंती पत्नीने केली. ती खंडपीठाने मान्य केली नाही.