अख्खी नवी मुंबई खोदली; महावितरणच्या अधिकाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा, उपमहापौरांचे महापालिका आयुक्तांना पत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Kolhapur Roads Newly Tarred Roads Dug Up Again; Public Funds Wasted

महावितरण कंपनीने वाशी आणि सानपाड्यासह शहराच्या विविध भागात विनापरवानी खोदकाम केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे. या खोदकामांमुळे नवी मुंबईकरांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी नवी मुंबई महापालिकेचे उपमहापौर दशरथ भगत यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

वाशी येथील सेक्टर 30, 31, 31ए तसेच सानपाडा येथील सेक्टर 1 आणि 13 ते 20 या परिसरात महापालिकेच्या रस्ते, पदपथ व इतर मालमत्तांवर विनापरवानगी महावितरण कंपनीकडून वारंवार खोदकाम करण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तोडफोड होत आहे. हे काम नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याने शहराच्या नियोजित विकासकामांमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी, कामांची गती मंदावून दर्जा व शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत आहे. खोदकामामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद ठेवावे लागतात. त्याचा मोठा परिणाम त्या भागातील वाहतूक व्यवस्थेवर होत आहे.

प्रदूषणात वाढ
अनियमित खोदकामामुळे रस्त्यांवर धूळ उडून वायूप्रदूषणात वाढ होत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. महावितरणच्या बेफिकीर कार्यपद्धतीमुळे वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेल्या महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम झाला आहे. नागरी व औद्योगिक क्षेत्रांनाही त्याचा मोठा फटका बसला असल्याचे उपमहापौरांनी स्पष्ट केले आहे.