
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरुमीत राम रहिम याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 9 वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्याला दणका दिला आहे. पंजाब सरकारने राम रहिम विरोधात 2015 मधील गुरू ग्रंथ साहिब ग्रंथाच्या अवमान प्रकरणी तीन खटले चालविण्यास मंजुरी दिली आहे.
2015 साली गुरू ग्रंथ साहिब ग्रंथाच्या अवमान प्रकरणाच्या तपासाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मार्च महिन्यात अवमाननेच्या आरोपाखाली चाललेल्या तीन प्रकरणांच्या तपासाला पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यात आली होती. या आदेशाला पंजाबच्या भगवंत मान सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडून लावण्यात आलेली स्थगिती उठवली. सोबत राम रहिमला नोटीस जारी करून चार आठवड्यात त्याचे उत्तर मागवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता राम रहिम विरोधात कनिष्ठ न्यायालयात ट्रायल सुरू होऊ शकेल.
पंजाब सरकारने डेरा सच्चा समितीचे तीन सदस्य प्रदीप क्लेर, हर्ष धुरी आणि संदीप बरेटा यांच्याविरोधात खटला चालविण्यास मंजुरी दिली आहे. वृत्तानुसार, पंजाबच्या फरीदकोट परिसरात दाखल केलेल्या तीन प्रकरणांमध्ये खटला चालविण्यास मंजुरी दिली आहे.