
आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱया खेळाडूला चक्क हिंदुस्थानी संघात निवडले जाते. एवढेच नव्हे तर त्याला कसोटी संघातही स्थान दिले जाते. पण जो आपल्या नेतृत्व आणि फलंदाजीच्या जोरावर संघाला आयपीएलचे प्ले ऑफ गाठून देतोय, अशा श्रेयस अय्यरला आगामी इंग्लंड दौऱयासाठी निवडावे, असे बीसीसीआयच्या निवड समितीला न वाटणे ही त्यांची घोडचूक ठरू शकते. अशा अपमानास्पद वागणुकीनंतरही फायर असलेला अय्यर शांत असला तरी तो आपल्या खेळानेच सर्वांची बोलती बंद करणार, हे पक्के आहे. मात्र फॉर्मात असलेल्या श्रेयसवर नेमका राग कुणाचा आहे, हे कोडं अद्याप उलगडू शकलेलं नाही.
गेल्या वर्षी रणजी सामन्यात न खेळल्यामुळे श्रेयसला हिंदुस्थानी संघातून थेट वगळण्यात आले होते. त्याला केंद्रीय करारातूनही मुक्त करण्यात आले होते. श्रेयसला दिलेली ही फार मोठी शिक्षा होती. या शिक्षेनंतरही श्रेयसने आपल्या फलंदाजी आणि नेतृत्वातून सर्वांना सणसणीत चपराक दिली की त्याला पुन्हा संघात घ्यावे लागले होते. केंद्रीय करारात त्याच्या नावाची नोंद करावी लागली होती.
अजित आगरकर असताना मुंबईकरावर अन्याय
मुंबईकर असलेले अजित आगरकर हे सध्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या खेळाडूंवर अन्याय होतोय आणि याबाबतीत कुणी साधा ‘ब्र’सुद्धा काढलेले नाही. इंग्लंडच्या पाच कसोटी सामन्यांच्या दौऱयावर हिंदुस्थानची मधली फळी बळकट करण्याचे आव्हान निवड समितीवर होते आणि त्यांनी श्रेयस अय्यर आणि सरफराज खान या मधल्या फळीतील मुंबईकर खेळाडूंनाच मैदानाबाहेर काढले आहे. एकवेळ सरफराजला वगळणे समजू शकतो. त्याची कामगिरीही फारशी समाधानकारक नव्हती. पण यंदाच्या रणजी मोसमात आणि आता आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या श्रेयसला संघात स्थान न मिळणे हा मुंबई क्रिकेटचा फार मोठा अपमान आहे.
इंग्लंड दौऱयासाठी निवड हा श्रेयसचा हक्कच
विराट कोहलीच्या तडकाफडकी कसोटी निवृत्तीनंतर हिंदुस्थानच्या मधल्या फळीला बळकटी देण्यासाठी श्रेयस अय्यरची निवड करणे बीसीसीआयचे परमकर्तव्य होते. त्यातच हिंदुस्थानी संघ संकटात असताना बीसीसीआयच्या तज्ञ निवड समितीने चक्क पाच-पाच सलामीवीरांची वर्णी लावली, पण मधल्या फळीत श्रेयस अय्यरला स्थान द्यावे असे कुणालाही वाटले नाही. हीच क्रिकेटची खूप मोठी शोकांतिका आहे.
…तर श्रेयसही इंग्लंड गाठणार
आता श्रेयसच्या नावावर बीसीसीआयने फुल्ली मारली असली तरी त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबने आपले पहिलेवहिले आयपीएल जेतेपद जिंकण्यात यश मिळवले तर बीसीसीआयला पुन्हा एकदा श्रेयसच्या नावाचा विचार करावा लागेल. हिंदुस्थानची फलंदाजी इंग्लिश वातावरणात कोलमडल्यावर निवड समितीला आपली घोडचूक लक्षात येईल आणि त्याला मागाहून दौऱयावर पाठवण्याचा निर्णयही घ्यावा लागू शकतो.
श्रेयसची वर्षभरातील कामगिरी
- रणजी क्रिकेटच्या यंदाच्या मोसमात 90 धावांच्या सरासरीने 452 धावा.
- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत हिंदुस्थानसाठी सर्वाधिक 243 धावा.
- सुरू असलेल्या आयपीएलमध्ये पंजाबसाठी नेतृत्व करताना 14 सामन्यांत 9 विजय आणि फलंदाजीत 51.40 धावांच्या सरासरीने 5 अर्धशतकांसह 514 धावा.
रागाला आग लावायला हवी!
हिंदुस्थानी संघाच्या निवड प्रक्रियेत सध्या फार उच्चस्तरीय राजकारण खेळले जात आहे. सध्या एक अदृश्य शक्ती हिंदुस्थानी क्रिकेटला चालवतेय. जो रणजी मोसमात चमकला, ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडला आणि आता आयपीएलमध्येही तो संघासाठी लढतोय आणि जिंकतोय. असं असतानाही त्याच्यासाठी कसोटी संघाचे द्वार उघडले जात नाहीत, हे मनाला पटतही नाहीय आणि पचतही नाहीय. निवडीसाठी आणखी काय वेगळे लागते? त्याच्या खेळापेक्षा त्याच्यावर कुणाचा तरी राग असल्याचा भास होतोय आणि या रागापोटीच श्रेयसवर अन्याय केला जात आहे. त्याच्या दमदार खेळाचा सरळ घोर अपमान केला जात आहे. अशा रागाला खुद्द श्रेयसच आपल्या खेळाने आग लावेल. पण त्याचबरोबर आता मुंबईकर क्रिकेटप्रेमींनीही आपला राग व्यक्त करत बीसीसीआयला याबाबत जाब विचारायला हवा, अशी प्रतिक्रिया एका क्रिकेटतज्ञाने नाव न टाकण्याच्या अटीवर दिलीय.