विधिमंडळाच्या खालावत चाललेल्या कामाच्या दर्जावर आमदारांकडून चिंता, विधानमंडळात बाजारासारखे वातावरण नको – देवेंद्र फडणवीस

Devendra fadanvis chief minister maharashtra

दक्षिणेच्या राज्यात ‘खून के प्यासे’ असे राजकारण बघायला मिळते. महाराष्ट्रात असे झाले नाही, पण अलीकडच्या काळात राजकीय संवाद कमी झाला आहे. या कायदे मंडळाच्या लॉबीत चालायला जागा नसते. एक आमदार वीस-पंचवीस कार्यकर्ते विधान भवनात घेऊन येतो. मंत्र्यांच्या चेंबरमध्ये शिरायला जागा नसते. गेल्या वीस-पंचवीस वर्षांपूर्वी अशी अवस्था नव्हती. विधिमंडळात दर्जात्मक काम झाले पाहिजे. बाजारासारखे वातावरण विधानमंडळात असू नये, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेला पाठिंबा देताना सदस्यांनी कामकाजाचा दर्जा खालावत असल्याची खंत व्यक्त केली.

विधानसभा अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यावर अभिनंदन प्रस्तावावर झालेल्या भाषणात सदस्यांमध्ये जोरदार टोमणे, प्रतिटोपणे, उत्तराला प्रत्युत्तर, कोट्या अशी जुगलबंदी पाहायला मिळाली. सदस्यांच्या प्रत्येक फटकेबाजीवर सर्वपक्षीय सदस्यांमध्ये हास्याची जोरदार लकेर उमटत होती.

पुराणात आणि आजही ‘अमृता’चे महत्त्व

सभागृहातील सर्वात तरुण आमदार म्हणून अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर रोहित आर. आर. पाटील केलेल्या भाषणाने सर्व सदस्यांचे लक्ष वेधून घेतले. राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन करताना रोहित पाटील म्हणाले की, सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही जो मान पटकावला आहे तसाच सर्वात तरुण आमदार म्हणून मी पटकावला आहे. तरुण अध्यक्ष म्हणून सर्वात तरुण आमदारावर बारीकपणाने लक्ष असेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस यांचेही अभिनंदन करताना रोहित पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देताना ‘अमृताहूनही गोड नाव तुझे देवा…’ असा उल्लेख करताच समोरच्या बाकावरून ‘अमृताहुनी गोड’ असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यावर ‘अमृता’हूनही गोड असे मी मुद्दाम म्हटले; कारण पुराणात ‘अमृता’ला एक वेगळे महत्त्व होते आणि आजही आहे असे सांगताच फडणवीसांसह सर्वच सदस्यांनी रोहित पाटील यांना मनापासून हसतहसत दाद दिली.

कामकाजाचा दर्जा खालावतोय

अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण करताना भाजप आमदार सुरेश धस यांनी सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले. दिवसेंदिवस कामकाजाचा दर्जा अतिशय खालच्या दर्जाचा चालला आहे. बिले तीन मिनिटात मंजूर होतात आणि लक्षवेधीवर दीड तास भाषणे होतात. मंत्र्यांना बोलावण्यासाठी बेल वाजवावी लागते. मंत्री येण्यासाठी सभागृहाचे काम दहा मिनिटे थांबवावे लागते. हे दुदैव आहे. विधान भवनाच्या बाहेरील गर्दी कमी केली पाहिजे. कोणीही यावे आणि कुठेही जावे. विधान भवनात येण्यासाठी कोणालाही पास मिळतो हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली

योग्य वेळी योग्य निर्णय

1990 मध्ये मी आमदार झालो असे बोलण्याऐवजी मी अध्यक्ष झालो असे जयंत पाटील अनावधानाने म्हणाले. त्यावर अजित पवार यांनी चूक सुधारत, पहिल्यांदा आमदार झालात असे सांगताच जयंत पाटील मिश्किलपणे म्हणाले, की बघा यांचं किती लक्ष आहे माझ्यावर. तेव्हा एका क्षणाचा विलंब न लावता अजित पवार म्हणाले की ‘माझं तुमच्यावर लक्ष असून काय उपयोग आहे? तुम्ही प्रतिसाद देत नाही.’ यावर तत्काळ उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, ‘दादा, आपल्या पक्षाचे एक वाक्य आहे, ‘योग्य वेळी योग्य निर्णय’ …. या वाक्यावर सभागृहात पुन्हा हशा उसळला.

मंत्र्यांना धडपड करावी लागते

विधान भवनातील वाढत्या गर्दीवर जयंत पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली. सभागृहात येताना आमदारांना चालायला अवघड होते. सभागृहात येऊन उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांना धडपड करावी लागते. अनेक जण मंत्रालयात येतात आणि दिसेल त्या मंत्र्याकडे जाऊन गर्दी करतात.

बहुमताचा गर्व नको

अभिनंदनाच्या प्रस्तावावर भाषण करतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांचे गोडवे गायले. काँग्रेसचे नाना पटोले 208 मतांनी निवडून आले असा उल्लेख केला. त्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी यावर नाराजी व्यक्त केली. जनतेच्या मतावर सभागृहात हास्यकल्लोळ होतो. 208 मतांनी निवडून आले म्हणून टिंगल होते. पण तुम्हाला बहुमत मिळाले म्हणून गर्व करण्याची गरज नाही. बहुमताच्या जोरावर लोकांच्या मतांचा आवाज दाबू नका, असा इशारा दिला. यावेळी विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, नितीन राऊत, विश्वजित कदम यांचीही भाषणे झाली.

नार्वेकरांचा निकाल आणि सुप्रीम कोर्ट

आमदार अपात्रतेच्या याचिकेवर राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली होती त्याचा उल्लेख करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जयंत पाटील म्हणाले की, नार्वेकर यांनी निकाल असा दिला की, त्यावर सुप्रीम कोर्टाला अजून त्यावर निकाल देता आलेला नाही. नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्ट अजून विचार करते आहे. सुप्रीम कोर्टाचे एक मुख्य न्यायमूर्ती घरी गेले. त्यांनीही त्या निकालाला हात लावला नाही. त्यावर भाष्य केले नाही असे सांगताच हास्याचा फवारा उडाला. आमदार अपात्रतेच्या सुनावणीत तुम्ही कोणाला अपात्र ठरवले नाही याचाही जयंत पाटील आवर्जून उल्लेख केला.