
हिंदुस्थानी बॅडमिंटनला आता नवा सुपरस्टार मिळालाय. हरियाणाची 20 वर्षीय युवा खेळाडू देविका सिहाग हिने थायलंड मास्टर्समध्ये धडाकेबाज कामगिरी करत महिला एकेरीचा किताब जिंकला. तिचा कारकीर्दीतील हा पहिला बीडब्ल्यूएफ सुपर 300 किताब होय, हे विशेष.
तब्बल 2.5 लाख डॉलर बक्षिसाच्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात देविकाने मलेशियाच्या गोह जिन वेईला दबावाखाली आणले. देविका 21-8, 6-3 अशी भक्कम आघाडीवर असतानाच, जागतिक क्रमवारीत 68 व्या स्थानी असलेल्या आणि दोन वेळच्या कनिष्ठ गटातील जगज्जेत्या गोह जिन वेईने हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे माघार घेतली. याच क्षणी देविकाच्या कारकीर्दीतील सर्वात मोठया जेतेपदावर शिक्कामोर्तब झाले.
देविकाच्या यशाची शिडी
- ऑगस्ट 2025 मध्ये मलेशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकत पहिले आंतरराष्ट्रीय जेतेपद. n 2025 साली जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या मिश्र संघाला कांस्यपदक मिळवून देण्यात मोलाचा वाटा.
- मागील सत्रात इंडोनेशिया मास्टर्स सुपर 100 स्पर्धेत उपविजेती.
- 2024 मध्ये चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अंतिम फेरीत प्रवेश. यात स्वीडिश ओपन आणि पोर्तुगाल इंटरनॅशनलमध्ये विजेतेपद, तर एस्टोनियन इंटरनॅशनल आणि डच इंटरनॅशनलमध्ये उपविजेतेपद.


























































